राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सामाजिक संकेत स्थळावर सक्रिय झाला आहे. या माध्यमातून होणारा गुजरातचा प्रचार चुकीचा आहे. मोदींविषयी पेरली जाणारी माहिती चुकीची असल्याने त्याचा विरोध करण्यासाठी काँग्रेसने ‘खिडकी’ नावाचे संकेतस्थळ विकसित केले आहे. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ही खिडकी उघडायची कशी आणि त्यातून नक्की कोणता संदेश द्यायचा याची माहिती देण्यासाठी राज्य स्तरावरील प्रशिक्षण औरंगाबाद येथे घेण्यात आले.
देशभरात १० लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असणाऱ्या शहरात सामाजिक संकेतस्थळे कशी वापरावीत, यासाठी तज्ज्ञांमार्फत प्रशिक्षणे देण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमाद्वारे राज्याच्या काँग्रेसने कम्युनिकेशन विभाग सुरू केला आहे. या विभागाकडून ट्विटर, फेसबुक व अन्य सामाजिक संकेतस्थळांचा कार्यकर्त्यांनी कसा उपयोग करावा, या विषयीचे मार्गदर्शन होणार आहे. कार्यकर्त्यांमध्ये राजकीय सजगता यावी म्हणून हा उपक्रम सुरू करण्यात आल्याची माहिती या विभागाचे प्रमुख सचिन सावंत यांनी रविवारी दिली.
काँग्रेसची ही ‘खिडकी’ सध्या कार्यकर्त्यांसाठीच असून अन्य व्यक्तींना ती उघडता येणार नाही. औरंगाबादमधून या विभागात काम करण्यासाठी चांगली फळी निर्माण होईल, असे श्री. सावंत म्हणाले. देशात सध्या जातीय दंगली निर्माण व्हाव्यात अशा प्रकारचे वातावरण निर्माण केले जात आहे. असे प्रयत्न थांबविण्यासाठी कार्यकर्त्यांनी काय करावे याचे मार्गदर्शन या प्रशिक्षणातून केल्याचे सावंत यांनी सांगितले. गुजरातमधून येणारे संदेश ‘पेड आर्मी’ असल्याचा आरोपही त्यांनी केला. एखाद्या एजन्सीला कंत्राट देऊन प्रतिमा उभी केली जात असल्याचे सांगत त्याला उत्तर देण्यासाठी कार्यकर्त्यांमार्फत  ‘खिडकी’ उघडली जाणार आहे. कार्यकर्ता आणि नेता यांच्यातील अंतर कमी करण्यासाठी याचा उपयोग होईल, असा दावा सावंत यांनी केला. मराठावाडय़ातील ५०० हून अधिक कार्यकर्त्यांना सामाजिक संकेतस्थळाचे भान या अनुषंगाने प्रशिक्षण देण्यात आले.