गैरव्यवहार, भ्रष्टाचार, मनमानी कारभार अशा अनेक कारणांमुळे सहकार क्षेत्रावरील लोकांचा विश्वास उडत चालला असून त्याचा फटका सर्वसामान्यांना बसू लागला आहे. पतसंस्थांमध्ये गुंतविलेले पैसे परत मिळत नसल्याने आत्महत्येचा मार्ग स्वीकारावा की काय, अशा मन:स्थितीत अनेक जण आहेत. देवळा तालुक्यातील वाखारवाडी येथील सुनंदा बळीराम निकम या त्यातीलच एक होय.
जिल्ह्यातील सुमारे २७ पतसंस्था डबघाईस आल्या असल्याची कागदोपत्री नोंद असली तरी ही संख्या त्यापेक्षा अधिक आहे. लोकांनी गुंतविलेले पैसे परत मिळत नसल्याने ते हवालदिल झाले आहेत. अनेकांच्या घरची परिस्थिती बिकट असल्याने पतसंस्था किंवा बँकांमध्ये ठेवीच्या स्वरूपात गुंतविलेल्या पैशांवर त्यांची भिस्त होती. परंतु संचालकांच्या मनमानी कामकाजामुळे तसेच सहकार खात्याच्या दुर्लक्षामुळे पतसंस्था व बँका डबघाईस आल्याने ठेवीदारांपुढे मोठे संकट उभे राहिले आहे. वाखारवाडी येथील सुनंदा निकम यांची कैफियत हेच सांगते. निकम या विधवा असून त्यांनी देवळा येथील रामचंद्र विनायक कोठावदे ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेत मोलमजुरी करून दोन मुलींच्या भविष्यासाठी ८८ हजार रुपये गुंतविले. सध्या त्या आई-वडिलांकडे राहात असून त्यांच्या घरची परिस्थितीही बिकट आहे. दामदुप्पट योजनेत गुंतविलेल्या पैशांवर निकम यांनी भविष्यातील काही योजना आखल्या होत्या. ठेवींची मुदत संपून गेल्यावरही त्यांना ही रक्कम मिळालेली नाही. त्यास आता वर्ष पूर्ण होत आले आहे. त्यातच दुष्काळी परिस्थितीमुळे परिसरात काम मिळणे दुरापास्त झाले आहे. अशा स्थितीत उदरनिर्वाहासाठी निकम यांच्यापुढे सध्या कोणताच पर्याय नाही. पैशांअभावी मुलींचे शिक्षण आणि लग्न थांबले असून या बिकट परिस्थितीमुळे वैतागलेल्या निकम यांनी शासकीय जिल्हा कृती समितीचे सदस्य पां. भा. करंजकर यांच्याकडे निवेदनाव्दारे आपली कैफियत मांडली आहे.
यासंदर्भात करंजकर यांनी जिल्हाधिकारी विलास पाटील व जिल्हा उपनिबंधकांना निवेदन सादर करून या प्रकरणात लक्ष देण्याची विनंती केली. सुनंदा निकम यांनी आत्महत्येचा मार्ग स्वीकारल्यास त्यास आपणच जबाबदार राहाल, असा इशारा दिला आहे. दुसरीकडे करंजकर यांनी निकम यांच्याशी दूरध्वनीव्दारे संपर्क साधत रक्कम मिळवून देण्याबाबत प्रयत्न करण्याचे आश्वासन देऊन दिलासा दिला आहे.