तालुक्यातील टाकळी खंडेश्वरी, माहीजळगाव, सुपा, चिंचोली, पाटेगाव, निंबोडी, आनंदवाडी, नवसरवाडी, सीतपूर यासह सुमारे पंधरा गावांमध्ये झालेल्या वादळी पावसाने सुमारे १ कोटी रुपयांपेक्षा जास्त नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले आहेत.
तालुक्यातील काही भागांमध्ये गुरुवारी रात्री वादळी वा-यासह जोरदार पाऊस झाला. या वादळी पावसामुळे तालुक्यातील माहीजळगाव, चिचोंली, टाकळीखंडेश्वरी, सुपा, पाटेवाडी, पाटेगाव, आनंदवाडी, नवसरवाडी, निबोंडी, सीतपूर, यासह परिसरातील काही गावांमध्ये याचा जोरदार फटका बसला. रब्बी ज्वारी, कापूस, डाळिंबाच्या बागांचे मोठे नुकसान झाले. ज्वारीचे उभे पीक जमिनीवर लोळले. नेमके या परिसरात सध्या सीना धरणाचे आवर्तन सोडण्यात आले असून ज्वारीच्या पिकाला हे शेवटच्या पाण्याचीच गरज होती.
तालुका कृषी अधिकारी राजेंद्र सुपेकर व प्रभारी तहसीलदार पोपटराव कोल्हे यांनी तातडीने कृषी अधिकारी व कामगार तलाठी यांना गावोगावी शेतक-यांच्या शेतामध्ये जाऊन पंचनामे केले असून, सुमारे ७०० हेक्टर क्षेत्रात नुकसान झाले आहे. त्याची नजरअंदाज किंमत काढली असून ती हेक्टरी १५ हजारपर्यंत होऊ शकते असा अंदाज आहे.