ओझर विमानतळावर सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आणि ठेकेदारांनी आयोजिलेल्या मद्यपार्टीवरून गदारोळ उडाला असताना मनसेने ठेकदार आणि अधिकारी यांच्या सुमधुर संबंधांवर बोट ठेवले आहे. या विमानतळाची उभारणी करणारा ठेकेदार आणि बांधकाम विभागाचे अधिकारी यांच्या संबंधांची शहानिशा करण्यासाठी विमानतळ बांधकामावर झालेल्या खर्चाची चौकशी करावी, अशी मागणी मनसेने केली आहे. बांधकाम विभागाची अनेक कामे अधिकाऱ्यांनी सुशिक्षित बेरोजगारांना डावलून आपल्या मुले, मुली व सुनांच्या नावावर घेतल्याचा आरोपही मनसेने केला.
नाशिकला हवाई नकाशावर आणण्यासाठी साकारलेल्या ओझर विमानतळाचा वापर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी पार्टीसाठी केल्याची बाब उघड झाल्यानंतर ठेकेदारासह या विभागातील अधिकाऱ्यांकडून सारवासारव सुरू झाली आहे. शनिवारी मध्यरात्री उशिरापर्यंत चाललेल्या पार्टीत कर्कश डिजेचा आवाज, मद्यपानासह महिलांच्या नाचगाण्याचाही कार्यक्रम रंगल्याचे सांगितले जाते. स्थानिक ग्रामस्थांनी आक्षेप घेण्याचा प्रयत्न केला असता संबंधितांकडून शासकीय परवानगी घेऊन कार्यक्रम होत असल्याचे सांगण्यात आले. या संदर्भात तक्रार देऊनही पोलिसांनी चौकशी करुन कारवाई करण्याचे म्हटले होते. या पार्टीचे पडसाद राजकीय पातळीवर उमटत आहे. भाजपच्या खासदारांनी आदल्या दिवशी विमानतळाची पाहणी करून थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली. सोमवारी मनसेने देशाच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने महत्वपूर्ण असणाऱ्या विमानतळावर झालेल्या पार्टीचा निषेध केला. ही अतिशय गंभीर बाब आहे. सार्वजनिक बांधकामच्या नाशिक विभागाचे मुख्य अभियंता पी. वाय. देशमुख निवृत्त झाल्यानिमित्त थेट विमानतळावर ठेकेदार व अधिकाऱ्यांनी मद्यपार्टीचे आयोजन करण्यात आले. या पार्टीला परवानगी घेतल्याचे विमानतळ बांधणीचा ठेका घेणारे ठेकेदार विलास बिरारी यांनी म्हटले आहे. संबंधित ठेकेदाराने पार्टीला परवानगी घेतल्याचे सांगितले. वास्तविक, ठेकेदार या जागेचे मालक नाहीत, या बांधकामाचा ठेका देताना निवृत्त मुख्य अभियंता देशमुख यांनी त्यांच्यावर काही विशेष मेहेरबानी केली काय, याचा शोध घेणे महत्वाचे असल्याचे मनसेचे नगरसेवक सुदाम कोंबडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
भारतीय सेवा नियमानुसार कोणत्याही शासकीय अधिकाऱ्यास व्यावसायिक संबंध येणाऱ्या कोणत्याही व्यक्ती वा कंपनीची तारांकीत व भव्य पार्टी स्वीकारता येत नाही. उपरोक्त पार्टीत आयोजन करणारे ठेकेदार आणि पार्टी घेणारा हा सरकारी अधिकारी होता हे लक्षात येते. त्यामुळे पी. वाय. देशमुख यांची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करावी आणि तोपर्यंत निवृत्तीनंतरचे कोणतेही लाभ त्यांना देऊ नयेत, अशी मागणी कोंबडे यांनी केली.
ओझर विमानतळाच्या बांधकामाचे परीक्षण करून देशमुख यांच्या अखत्यारीत असलेल्या भगूर रस्त्यालगतचे कामकाज त्यांच्याच कोणी नातेवाईक करतो का, याची चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केली. बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांनी सुशिक्षित बेरोजगारांसाठी राखीव असलेली कामे आपली मुले, मुलगी व सुनांच्या नावावर घेतली आहेत. याची स्वतंत्रपणे चौकशी करण्याची मागणी मनसेने निवेदनाद्वारे मुख्यमंत्री व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मंत्र्यांकडे केली आहे.