विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन ९ डिसेंबरला सुरू होत असून कॅबिनेट मंत्र्याचे निवासस्थान असलेल्या रविभवनातील परिसर आणि खोल्या सुशोक्षित करण्यावर पुन्हा एकदा भर दिला जात आहे. रविभवनमधील खोल्यांवर रंगरंगोटी आणि सुशोभित करण्यासाठी कोटय़वधी रुपये खर्च केले जात असून मंत्र्यांचे आदरातिथ्य करण्यासाठी अधिकारी कामाला लागले आहेत. रविभवनातील बंगल्यांचे वाटप करण्यात आले असून नारायण राणे आणि छगन भुजबळ एकमेकांच्या शेजारी राहणार आहे तर पालकमंत्री शिवाजीराव मोघे यांच्या नावे असलेल्या त्यांचा बंगला सेवा ज्येष्ठतेनुसार आदिवासी विकास मंत्री मधुकर पिचड यांना दिला आहे.
राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशनाला ९ डिसेंबरपासून प्रारंभ होत असून नागभवन आणि रविभवनातील केवळ कागदावर खोल्यांचे वाटप करण्यात आले असले तरी प्रत्यक्षात मात्र खोल्यांच्या बाहेर मंत्र्याच्या नावांच्या पाटय़ा अजूनही लावण्यात आलेल्या नाहीत. रविभवनातील काही कॉटेजमध्ये अजूनही रंगरंगोटी व डागडुजीचे काम सुरू आहेत. गेल्यावर्षी एक बालकामगार रंगरंगोटी करीत असताना दिसून आला त्यावरून संबंधित कंत्राटदारावर कारवाई करण्यात आली होती. यावर्षी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी बालकामगार कामावर दिसले तरी कंत्राट रद्द करण्याचा इशारा कंत्राटदारांना दिल्यामुळे यावेळी कंत्राटदार खबरदारी घेत आहे. आंध्रप्रदेश आणि छत्तीसगडमधून अनेक कुटुंब नागपुरात अधिवेशनाच्या निमित्ताने मजुरीसाठी आले असून त्यांची मुले कुठल्याही शासकीय निवासस्थानात दिसू नये याची काळजी घेतली जात आहे. रविभवनात सभापती, अध्यक्ष, उपसभापती आणि उपाध्यक्षासह दोन्ही सभागृहाच्या विरोधी पक्ष नेत्यांचे बंगले आहेत. कॅबिनेट मंत्र्यांची निवास व्यवस्था रविभवनात तर राज्यमंत्र्यांची नागभवनात करण्यात आली आहे. रविभवनात ३० बंगले आणि ८० कक्ष आहेत. सर्व कक्षांमध्ये सचिव पातळीवरील अधिकाऱ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.
 रविभवनमध्ये बंगला क्रमांक ३ शिवाजीराव देशमुख (सभापती), १७ दिलीप वळसे पाटील (अध्यक्ष), २० वसंत डावखरे (उपसभापती), १९ वसंत पुरके (उपाध्यक्ष), २२ विनोद तावडे (विरोधी पक्ष नेते), २३ एकनाथ खडसे (विरोधी पक्ष नेते), कुटीर १ मध्ये उद्योगमंत्री नारायण राणे, कुटीर २ सार्वजानिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ, कुटीर ३ गृहमंत्री आर.आर. पाटील, कुटीर ४ आदिवासी विकास मंत्री मधुकर पिचड, कुटीर ५ सामाजिक न्याय मंत्री शिवाजीराव मोघे, कुटीर ६ वनमंत्री पतंगराव कदम, कुटीर ७ राज्य उत्पादन शुल्क मंत्री गणेश नाईक, कुटीर ८ कृषी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, कुटीर ९ ग्रामीण विकास मंत्री जयंत पाटील, कुटीर १० सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, कुटीर ११ सार्वजानिक बांधकाम विभाग मंत्री जयदत्त क्षीरसागर, कुटीर १२ उत्पादन शुल्क मंत्री मनोहर नाईक, कुटीर १३ अन्न व नागरी पुरवठा मंत्री अनिल देशमुख, कुटीर १४ वैद्यकीय शिक्षण मंत्री डॉ. विजय गावित, कुटीर १५ सुनील तटकरे, कुटीर १६ महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, कुटीर २१ राजेश टोपे, कुटीर २४ शिक्षण मंत्री राजेंद्र दर्डा, कुटीर २५ मो. नसीम आरिफ खान, कुटीर २६  हसन मुश्रीफ, कुटीर २७ आरोग्य मंत्री सुरेश शेट्टी, कुटीर २८ रोहयो मंत्री डॉ. नितीन राऊत, कुटीर २९ पदमाकर वळवी, कुटीर ३० वर्षां गायकवाड, संजय देवतळे, मधुकर चव्हाण, पाणी पुरवठा मंत्री दिलीप सोपल, सचिन अहीर, फौजिया खान, राजेंद्र मुळक या मंत्र्याची निवास व्यवस्था नागभवनात करण्यात आली आहे. सरकारमध्ये असलेले रोहयो मंत्री डॉ. नितीन राऊत, अन्न व नागरी पुरवठा मंत्री अनिल देशमुख आणि अर्थराज्यमंत्री राजेंद्र मुळक यांचे निवासस्थान नागपुरात आहे. त्यामुळे त्याच्या बंगल्याचा केवळ कार्यालयीन कामासाठी व शिष्टमंडळाना भेटीसाठीच उपयोग होण्याची शक्यता आहे. गेल्या हिवाळी अधिवेशनात मंत्री म्हणून बंगल्यात राहणारे भास्कर जाधव, पाणी पुरवठा मंत्री लक्ष्मणराव ढोबळे आणि गुलाबराव देवकर यांचे निवासस्थान यावेळी आमदार निवासामध्ये राहणार आहे.