‘आज ६० वर्षांनी माझ्याच शाळेत परत येताना मला खरंच भरून येतं आहे..! या वास्तूत शिरताना असंख्य आठवणी माझ्या मनात दाटून आल्या आहेत. त्यावेळी शाळेने माणूस म्हणून दिलेली मूल्यं जन्मभर पुरली. पण हिंदी शिकायचं मात्र राहूनच गेलं’, अशा शब्दांत जगप्रसिद्ध वाद्यवृंदकार झुबिन मेहता यांनी आपल्या आठवणींना उजाळा दिला. निमित्त होते ते, सेंट मेरीज हायस्कूल या शाळेच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्षपूर्तीचे. त्यानिमित्ताने एका बोधचिन्हाचे अनावरण मेहता पती-पत्नींच्या हस्ते माझगांव येथील शाळेच्या सभागृहात करण्यात आले.जगाला आपल्या सांगीतिक रचनांनी वेड लावणाऱ्या ‘त्या’ गौरवर्णीय पारशीबाबांना पाहताच शाळेतील मुलांनी एकच गलका केला. झुबिन मेहता आणि त्यांच्या पत्नी नॅन्सी यांचे पंचध्वजांनी आणि भारतीय परंपरेला साजेसे स्वागत शाळेतर्फे करण्यात आले. ‘सेंट मेरीज’ ही मेहतांची शाळा. त्यामुळे शाळेत व्यासपीठावर उभे राहताना त्यांना गहिवरून आले. इतके की पाच-एक मिनिटे ते बोलूही शकले नाहीत. ‘मी या शाळेत पाचवी उत्तीर्ण झाल्यानंतर आलो. ती सारी वर्षे माझ्या आयुष्यातील अतिशय आनंदाची होती. उत्तम शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही घडत होतो. त्यावेळी आम्हाला तीन भाषा निवडाव्या लागत असत. मी हिंदीचा पर्याय असतानाही फ्रेंच निवडली होती. आज मागे वळून बघताना वाटतं की मी चूक केली. फ्रेंच काय किंवा जर्मन काय.. आजही युरोपात राहताना त्या भाषा शिकता आल्या असत्या. पण भारतीय भाषा शिकण्याची संधी मी गमावली ती मात्र कायमचीच.’,अशी खंत मात्र मेहता यांनी यावेळी व्यक्त केली.
सुदैवाने मी मुंबईत वाढलो. त्यामुळे येथे अनेक भाषांशी संबंध आला. मला हिंदी बोलता येत असलं तरी शास्त्रोक्त शिकलेलो नाही. पण येथे अनेक भाषा कानावर पडल्यामुळे जगभरात अनेक भाषा शिकणे सोपे गेले हे मात्र नक्की, अशी प्रांजळ कबुली मेहतांनी दिली. जगात कुठेही असलात तरी निवडलेल्या क्षेत्रात उत्तमाचा ध्यास धरायला विसरू नका, असा अनुभवी सल्लाही त्यांनी उपस्थित मुलांना दिला.
वंचितांना शिकवलंत तर त्याचा सर्वाधिक आनंद!
‘मुलांनो, तुम्ही झुबिनसारखे मोठे व्हाच, त्याचा मलाही अभिमान आहे. पण त्यापलीकडे शिकण्याची, घडण्याची, उभं राहण्याची, मूल्यांची जी शिकवणी आज तुम्हाला शाळेत आल्यामुळे मिळाली तिचे भान आयुष्यभर ठेवा आणि प्रत्येकाने शिक्षणापासून वंचित राहिलेल्या किमान एका तरी मुलाला शिकविण्याची जबाबदारी घ्या, ते पहायला मला आणि झुबिनलाही आवडेल, त्याचा अभिमान वाटेल’, अशा शब्दांत नॅन्सी यांनी मुलांशी संवाद साधला.