येत्या दोन वर्षांत राज्यातील सर्व जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, ग्रामपंचायती संगणकीकृत करण्याचा निर्धार ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांनी केला. जिल्ह्यातील रस्त्यांसाठी ५ कोटी निधी देण्याचेही त्यांनी जाहीर केले.
सोनपेठ तालुक्यातील शेळगाव येथे पर्यटक निवासाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. सोनपेठ तालुक्यातील सरपंच परिषदेचे या वेळी आयोजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी माजी मंत्री सुरेश वरपुडकर होते. जि.प. अध्यक्षा मीना बुधवंत, मुख्य कार्यकारी अधिकारी अजय सावरीकर, विजय भांबळे, सुरेश जाधव, बालाप्रसाद मुंदडा, रुक्मिणीबाई सावंत, गंगुताई िशदे, रफीक कुरेशी उपस्थित होते.
पाटील म्हणाले, की प्रत्येक ग्रामपंचायतीचे स्वरूप बदलण्याचा प्रयत्न आहे. चौदाव्या वित्त आयोगातून दोन वर्षांत ग्रामस्तरापर्यंत संगणकाचे जाळे विणण्यात येईल. ग्रामीण भागातील कोणाला त्याच्या कामासाठी जिल्हास्तरावर येण्याची गरज भासणार नाही. त्याच्या अर्जावर काय कार्यवाही झाली, सध्या कोणत्या स्तरावर अर्ज आहे यासारखी माहिती ग्रामपंचायतीत बसून पाहता येईल, अशी प्रणालीही विकसित केली जाणार आहे. कामात पारदर्शकता आणण्यात येईल. ग्रामविकासात पूर्वी राज्याचा तेरावा क्रमांक होता. त्यानंतर तिसरा क्रमांक आला. सध्या ग्रामविकासात महाराष्ट्राचा देशात पहिला क्रमांक असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले.
जिल्ह्यातील रस्त्यांचा उल्लेख करून रस्तेविकासासाठी ५ कोटी देण्याचे त्यांनी जाहीर केले. भारत निर्माण योजनेतून ग्रामीण भागात विकासाची अनेक कामे झाल्याचा दावा त्यांनी केला. अन्नसुरक्षा योजना, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोहयो योजना, पर्यावरण संतुलित समृद्ध गाव योजना आदींची माहिती पाटील यांनी दिली. माजी मंत्री वरपुडकर यांनी ग्रामीण भागाच्या विकासासाठी सरपंच, ग्रामस्थांनी सरकारच्या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले. विजय भांबळे यांचेही भाषण झाले. लक्ष्मीकांत देशमुख यांनी प्रास्ताविक केले.