इचलकरंजीतील यंत्रमाग कामगारांच्या मजुरीवाढीच्या प्रश्नी कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत सोमवारी रात्री उशिरापर्यंत बैठक सुरू राहूनही त्यामध्ये निर्णय होऊ शकला नाही. कामगारमंत्र्यांच्या उपस्थितीतील सलग तिसरी बैठक फिस्कटली आहे. यंत्रमागधारक प्रतिनिधींनी ७० पैसे मजुरी व १५ टक्के बोनस देण्याचा प्रस्ताव सादर केला. पण तो कामगार प्रतिनिधींनी फेटाळून लावला. आता याप्रश्नी रविवारी (१० फेब्रुवारी) रोजी दुपारी १२ वाजता पुन्हा प्रांत कार्यालयात बैठक होणार आहे.    
इचलकरंजीतील यंत्रमाग कामगारांनी मजुरीवाढीसाठी आंदोलन सुरू केले आहे. बेमुदत काम बंद आंदोलनाने सलग तिसरा सोमवार पाहिला. आज कामगारमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक होणार असल्याने यंत्रमाग कामगार कृती समितीने भव्य मोर्चा काढून शक्तिप्रदर्शन केले. सोमवारच्या मोर्चात कामगारांची संख्या प्रचंड प्रमाणात होती. मुख्य मार्गाने फिरून मोर्चा थोरात चौकात पोहोचल्यावर सभेत रूपांतर झाले. निश्चित वेतन मिळण्याची शक्यता नसल्याने मजुरीवाढीचा निर्णय घ्यायचा का अशी विचारणा कामगार नेत्यांनी केली. त्यास कामगारांकडून प्रतिसाद मिळाला.     
सायंकाळी चार वाजता सुरू होणारी बैठक मुश्रीफ हे उशिरा आल्याने दोन तासांच्या विलंबाने सुरू झाली. मुश्रीफ यांनी मंत्रीनियुक्त समिती, यंत्रमागधारक व कामगार प्रतिनिधी यांच्याशी वेगवेगळय़ा टप्प्यांवर चर्चा करून मते अजमावून घेतली. चर्चेअंती यंत्रमागधारक प्रतिनिधींनी ७० पैसे मजुरी व १५ टक्के बोनसचा प्रस्ताव दिला. पण कामगार प्रतिनिधींनी तो धुडकावून लावल्याने आजची बैठक निष्फळ ठरली. यानंतर मुश्रीफ यांनी १० फेब्रुवारीला पुन्हा बैठक घेणार असल्याचे जाहीर केले. दरम्यानच्या कालावधीत मंत्रीनियुक्त समितीचे सदस्य हे यंत्रमागधारक व कामगार प्रतिनिधींची चर्चा करून एक मताचा प्रस्ताव बनविण्यासाठी प्रयत्न करतील, असे सांगितले.