27 September 2020

News Flash

विना सिग्नल चौक अपघातांना निमंत्रण

महानगर पालिका हद्दीतील अनेक चौकांमध्ये अजूनही सिग्नलची व्यवस्था नाही. त्यामुळे अशा चौकांमध्ये वारेवार अपघात घडत असून अपघात टाळण्यासाठी सिग्नलची व्यवस्था करण्याची गरज व्यक्त करण्यात येत

| November 1, 2014 01:03 am

महानगर पालिका हद्दीतील अनेक चौकांमध्ये अजूनही सिग्नलची व्यवस्था नाही. त्यामुळे अशा चौकांमध्ये वारेवार अपघात घडत असून अपघात टाळण्यासाठी सिग्नलची व्यवस्था करण्याची गरज व्यक्त करण्यात येत आहे. तसेच चौकांमध्ये कार्यरत वाहतूक पोलिसांच्या दुर्लक्षामुळे बेशिस्त वाहनधारकांची फावत असून अशा पोलिसांवरही कारवाई करण्याची आवश्यकता भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलनाचे कार्यकर्ते विकास कवडे यांनी पोलीस आयुक्तांकडे दिलेल्या निवेदनात मांडण्यात आली आहे.
लोकसंख्येची भरमसाठ वाढ, वाहनांच्या संख्येत दिवसेंदिवस पडणारी भर, व्यावसायिकांचा माल आणणारी वाहने, नादुरूस्त आणि अरुंद रस्ते, तरुणाईकडून अमर्याद वेगाने दामटविण्यात येणारी दुचाकी वाहने, या सर्वाचा परिणाम म्हणजे अपघातास निमंत्रण. या सर्वावर नियंत्रणासाठी वाहतूक पोलिसांची व्यवस्था करण्यात आलेली असली तरी ती फारशी उपयोगी पडत नसल्याचे ठिकठिकाणच्या उदाहरणांवरून दिसून येत आहे. बेफाम वाहन हाकण्यामुळे काही अपघात झालाच तर वाहन हाकणारे बडय़ा घरातील असल्यावर पोलिसांवर कुठूनतरी दबाव आणून प्रकरण जागीच मिटविण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे अशा मंडळींवर गुन्हे दाखल होण्याऐवजी ते निर्दोष सुटतात. आपण गैर वागलो तरी आपणांस शिक्षा
होऊ शकत नाही, ही गुर्मी त्यातून येते. मग त्यानंतर असे वाहनधारक अधिकच निर्ढावतात. आपल्याविरुद्ध गुन्हा तर नोंदवून दाखवा असे म्हणणाऱ्यांची संख्या फार मोठी आहे. अशा प्रकारे बेशिस्तपणा करून आपण काहीच केले नसल्याच्या गुर्मीत वावरणाऱ्यांच्या जगात कोणालाच कायद्याची भीती वाटत नाही. अशा बडय़ा धेंडांना अद्दल घडविण्याची हिंमत वाहतूक पोलिसांकडून दाखवली जात नाही. त्यामुळेच वाहतुकीचे नियम न पाळून इतरांकडून त्यांचे अनुकरण केले जाते. त्याला पोलीस जबाबदार आहेत. अनेकदा चौकांमध्ये वाहतुकीचे तीनतेरा वाजले असताना वाहतूक पोलीस मात्र तिकडे दुर्लक्ष करून एकत्र थांबून चर्चा करताना दिसतात, असा आरोपही कवडे यांनी केला आहे.
शहरांत होणारे अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी काही उपाययोजना करणे सहजशक्य आहे. शालिमार, व्दारका, मुंबई नाका यासारख्या ठिकाणी असलेल्या चौकांचा आकार लहान करण्याची आवश्यकता आहे. या ठिकाणी सतत होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेता त्यांचा आकार लहान करण्याशिवाय गत्यंतर नाही. याशिवाय शहरातील अनेक त्रिफुली, चौफुली रस्त्यांच्या ठिकाणी चौक तर झाले आहेत. परंतु वाहतूक व्यवस्थेवर नियंत्रणासाठी सिग्नल नसल्याने वारंवार अपघात होत असल्याचे दिसून येत आहे. अशा चौकांमध्ये वाहन पुढे दामटण्यासाठी एकच स्पर्धा होऊन वाहतूक कोंडी तर होतेच, शिवाय अपघाताची शक्यताही नाकारता येत नाही. विशेष म्हणजे चौक ओलांडताना पादचाऱ्यांचीही फजिती होते. वाहनांच्या कोंडीत ते अडकण्याचे प्रकार अनेक ठिकाणी घडतात. अशा ठिकाणी वाहतूक पोलीसही उपलब्ध राहात नसल्याने या कोंडीतून वाट काढताना पादचाऱ्यांची अवस्था अक्षरश: चक्रव्यूहात अडकलेल्या अभिमन्यूप्रमाणे होते. त्यामुळे अशा सर्वच चौफुली, त्रिफुली, चौकांमध्ये सिग्नल व्यवस्था करण्याची आवश्यकता कवडे यांनी व्यक्त केली आहे.
जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, पोलीस आयुक्त, वाहतूक शाखेचे अधिकारी यांनी संयुक्तपणे अशा ठिकाणांची पाहणी करून सिग्नल तातडीने बसविण्यासाठी प्रयत्न करावेत, असे केल्यास अपघातांचे प्रमाण कमी होण्यात निश्चितच मदत होईल. शिवाय पंचवटीतील काटय़ा मारूती चौक, उड्डाणपुलालगतचे चौक या ठिकाणी सिग्नल व्यवस्था करण्यात आली असली तरी ते कायम बंद असतात. त्यामुळे असे बंद सिग्नल कोणत्याही कामाचे नसल्याने ज्या ज्या ठिकाणी सिग्नल बसविण्यात आले आहेत ते कार्यरत राहण्याची आवश्यकता आहे. असे होत नसल्याने काटय़ा मारूती चौकात वारंवार वाहतूक कोंडीला तोंड द्यावे लागते. या सर्व समस्यांची नोंद आयुक्तांनी घेण्याची गरजही निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 1, 2014 1:03 am

Web Title: without signal chowk invite accidents
Next Stories
1 नाशिकसह जिल्ह्यत जवखेडा हत्याकांडाच्या निषेधार्थ आंदोलनांची मालिका
2 कामगार कायद्याच्या अंमलबजावणीप्रश्नी जे. पी. गावित यांची संघर्षांची भूमिका
3 मालमत्ता व्यवहारात फसवणुकीचे सत्र सुरूच
Just Now!
X