विनातिकीट प्रवास करणाऱ्या फुकटय़ा प्रवाशांविरोधात पश्चिम रेल्वेने गेल्या वर्षीपासूनच कठोर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. तर मध्य रेल्वेनेही आता अशा फुकटय़ांभोवतीचा पाश आवळला आहे. जून महिन्यात मध्य रेल्वेवर तिकीट तपासनीस, रेल्वे कर्मचारी आणि आरपीएफ यांच्या मदतीने केलेल्या कारवाईत तब्बल १.७५ लाख प्रवाशांना पकडण्यात आले. या प्रवाशांकडून दंडापोटी ८.२४ कोटी रुपयांची रक्कम वसूल करण्यात आली. गेल्या वर्षी जून महिन्यातील कारवाईच्या तुलनेत ही रक्कम २४.१० टक्क्यांनी जास्त आहे. विशेष म्हणजे एप्रिल ते जून २०१४ या नव्या आर्थिक वर्षांच्या पहिल्या तिमाहीत विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या ६.३९ लाख एवढी प्रचंड आहे.
पश्चिम आणि मध्य रेल्वे या दोन्ही मार्गावर फुकटय़ा प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मध्य रेल्वेवर जून २०१३ मध्ये १.४७ लाख प्रवासी विनातिकीट प्रवास करताना आढळले होते. त्यांच्याकडून ६.६४ कोटी एवढा दंडही वसूल करण्यात आला होता. यंदा याच महिन्यात एकूण १.७५ लाख प्रवाशांना मध्य रेल्वेच्या कारवाईला सामोरे जावे लागले. त्यांच्याकडून वसूल केलेल्या दंडाची रक्कम ८.२४ कोटी एवढी आहे. ही रक्कम गेल्या वर्षीच्या तुलनेत २४.१० टक्के जास्त आहे.
नव्या आर्थिक वर्षांच्या पहिल्या तिमाहीचा विचार करता या काळातही मध्य रेल्वेवर गेल्या वर्षीपेक्षा जास्त फुकटे प्रवासी सापडले आहेत. एप्रिल ते जून २०१३ या काळात मध्य रेल्वेने गेल्या वर्षी ५.७३ लाख लोकांना विनातिकीट प्रवास करताना पकडले होते. त्यांच्याकडून २८.७९ कोटी रुपयेही दंडापोटी घेतले होते. यंदा या रकमेत १३.०९ टक्क्यांनी वाढ झाली आहे. यंदा मध्य रेल्वेवर याच तीन महिन्यांच्या काळात ६.३९ लाख फुकटय़ा प्रवाशांवर कारवाई झाली आहे. त्यांच्याकडून ३२.५६ कोटी रुपये दंडवसुलीही करण्यात आली आहे.
येत्या काळात विनातिकीट प्रवाशांविरोधातील कारवाई आम्ही अधिक तीव्र करणार आहोत. अधिकाधिक तिकीट तपासनीस, आरपीएफचे जवान आणि रेल्वे कर्मचारी या कारवाईसाठी नियुक्त केले जातील, अशी माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी नरेंद्र पाटील यांनी दिली.