प्रभावी व्यक्तिमत्व, फर्डे इंग्रजी आणि चित्रपटात काम देण्याचे आश्वासन देऊन प्रामुख्याने महिलांची फसवणूक करणाऱ्या भामटय़ाने दहिसरपाठोपाठ मीरा रोड येथेही आणखी एका महिलेला फसविल्याची बाब पुढे आली आहे. या ठकसेनाने आणखी काही महिलांना फसविले असण्याची शक्यता असल्यामुळे संबंधितांना पोलिसांनी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.
रवी कपूर (४०) हा भामटा आणि त्याची साथीदार रेश्मा सैय्यद (४५) या दोघांनी दहिसर येथे राहणाऱ्या किर्ती जोशी (३२) यांना जाळ्यात ओढले होते. बॅंकेत नोकरी करणाऱ्या किर्ती जोशी यांची कपूरशी ओळख झाली. मुलाला आपण चित्रपटात काम मिळवून देऊ शकतो. त्यासाठी पोर्टफोलिओ तयार करावा लागले, असे सांगून त्याने दोन लाख रुपये मागितले. प्रख्यात छायाचित्रकार डब्बू रतनानी पोर्टफोलिओ तयार करणार असल्याची थापही त्याने मारली आणि सुरुवातीला ५० हजार रुपये उकळले. पोर्टफोलिओ त्याने केलाच नाही. उलट पोलिसांत असल्याचा दावा करू लागला. मोबाईलच्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने कपूर याचे खरे नाव दुसरेच असल्याचे जोशी यांना समजले. त्यामुळे आपली फसगत होत आहे, हे लक्षात आल्यानंतर त्यांनी दहिसर पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनी रवी कपूर तसेच रेश्मा सैय्यद या दोघांना अटक केली. सध्या रवी कपूर दहिसर पोलिसांच्या कोठडीत आहे तर रेश्मा सैय्यद हिला जामिन मिळाला आहे.
त्याच्या अटकेचे वृत्त प्रसिद्ध होताच मीरा रोड येथील बॅंकेत काम करणाऱ्या रागिणी पटेल (नाव बदलले आहे) या विवाहित महिलेने अशाच प्रकारच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. रवी कपूरने मनोज अग्रवाल बनून त्यांच्याकडून तीन लाख रुपये तसेच सोन्याचे दागिने लंपास केल्याचे त्यांनी म्हटले आहे. रागिणी यादेखील बँकेत काम करतात. यावेळी या रवीऐवजी त्याची मैत्रिण रेश्मा सैय्यद त्यांना भेटली. यावेळी रवी कपूरची मनोज कुमार बन्सल-अग्रवाल अशी ओळख करून देऊन त्यांचे चित्रपटसृष्टीशी चांगले संबंध असल्याचे सांगितले. त्यानंतर मनोज अग्रवाल बनून रवी कपूर रागिणीला भेटला आणि चित्रपटात काम देतो असे आश्वासन देऊन पोर्टफोलिओ बनविण्यासाठी तीन लाख रुपये घेतले. याशिवाय सोन्याचे दागिनेही हडप केले. रागिणी यांच्या घरी कुणी नसताना त्याने पोर्टफोलिओ बनविण्याच्या नावाखाली रागिणी यांची आक्षेपार्ह अवस्थेतील छायाचित्रेही काढली, असे तक्रारीत नमूद करण्यात आले.