‘तुमच्या जागेवर मोबाइल टॉवर उभारा.. दरमहिना ६५ हजार रुपये कमवा..’ या जाहिरातीला भुललेल्या मुंबईतील एका महिलेला कोटय़वधी रुपयाचा गंडा घातल्याची बाब समोर आली आहे. या महिलेने आपल्या जागेत पाच टॉवर उभारण्याची अनुमती दिली. परंतु, विविध फी आणि इतर कामांसाठी दीड महिन्यातच या महिलेकडून तब्बल एक कोटी ६० लाख रुपये उकळण्यात आल्यानंतर हा प्रकार लक्षात आला. आर्थिक गुन्हे शाखेकडे या महिलेने तक्रार दाखल केली आहे. मोबाइल टॉवरसाठी जागा हवी आहे, महिन्याकाठी मोठे भाडे मिळेल, अशा आशयाची जाहिरात काही महिन्यांपूर्वी प्रसिद्ध झाली होती. त्या जाहिरातीमध्ये दिलेल्या दूरध्वनी क्रमांकावर उपनगरात राहणाऱ्या एका महिलेने संपर्क साधला. एक टॉवर उभारल्यास मासिक भाडय़ापोटी ६५ हजार रुपये मिळतील, असे त्यांना सांगण्यात आले. ठाणे जिल्ह्यातील पालघर येथील आपल्या मालकीच्या मोकळ्या भूखंडावर पाच टॉवर उभारण्यास त्यांनी अनुमती दिली. पाच टॉवरपोटी महिन्याकाठी अडीच लाख रुपये, तसेच अनामत स्वरूपात दोन कोटी रुपये या महिलेला मिळणार होते. या महिलेशी अदिती खन्ना नावाची तरुणी संपर्कात होती. ३० मे रोजी तिने या कंपनीबरोबर करार केला. सुरुवातीला फिर्यादी महिलेला ७२ लाखांचा आगाऊ धनादेश देण्यात आला. परंतु तो तातडीने बँकेत टाकू नका, अशी सूचना त्यांना करण्यात आली. त्यांनतर विविध फी, मुद्रांक शुल्क नोंदणीच्या नावाखाली पैसे देण्यास सांगण्यात आले. महिलेने ते पैसे भरताच २४ तासांत विविध एटीएममधून ती रक्कम काढली जायची. त्यानंतर माहिती अधिकारात तुमच्या विरोधात तक्रार दाखल झाली असल्याचे सांगत ती निस्तरण्यासाठी ४५ लाख रुपये या महिलेकडून घेण्यात आले. दरम्यान, या महिलेच्या मुलाला कॅनडामध्ये नोकरी देण्याचे आश्वासनही देण्यात आले होते.
ही संपूर्ण प्रक्रिया दीड महिना सुरू होती. मात्र सरकारी निर्णयामुळे मोबाइल टॉवर उभारण्याचा प्रकल्प रद्द झाला असल्याचे या महिलेला सांगण्यात आले. तेव्हा आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. उत्तर भारतातील गुरगाव, हरियाणा, उत्तराखंड, दिल्ली आदी भागांतील बँकांमध्ये खाती उघडण्यात आली होती. त्या खात्यांतूनच मोठय़ा रकमा काढण्यात आल्या होत्या. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच या महिलेने २७ ऑक्टोबर रोजी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार नोंदविली. या टोळीतील महिला गोडगोड बोलत असल्याने सुरुवातीला संशय आला नाही. मोठय़ा मोबाइल कंपनीचे नाव सांगण्यात आल्याने हा व्यवहार कायदेशीर वाटत होता. पण फसवणूक झाल्याचे कळले, तेव्हा खूप उशीर झाला होता, असे या फिर्यादी महिलेने सांगितले.