उरणमधील एसईझेडच्या कार्यालयात साफसफाईचे काम करणाऱ्या महिलेला कामावरून कमी करण्याची धमकी देत तिचे लैंगिक शोषण करणाऱ्या श्यामकुमार मिश्रा याचा महिलेच्या चुलतभावाने खून केला असल्याचे समोर आले आहे. यानंतर मिश्रा काही दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार त्याच्या नातेवाईकांकडून करण्यात आली होती. अखेर खोपटा परिसरातील सेझच्या जेटीजवळ त्याचा मृतदेह मिळून आला आहे. या प्रकरणी पीडित महिलेचा चुलतभाऊ मिलिंद पाटील याला उरण पोलिसांनी अटक केली आहे.
जेएनपीटी कामगार वसाहतीसमोर एसईझेडचे कार्यालय असून येथे साफसफाईचे काम करणाऱ्या महिलेला कामावरून कमी करून टाकीन अशी धमकी देत मिश्रा याने सप्टेंबर २०११ पासून ऑगस्ट २०१४ या कालावधीत लैंगिक शोषण केले असल्याचे चुलतभावाला सांगितले होते. या प्रकरणी महिलेने उरण पोलीस ठाण्यात मिश्रा याच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. यानंतर मिश्रा गायब झाला होता. यातच तो बेपत्ता झाल्याची तक्रार त्याच्या नातेवाईकांकडून दाखल करण्यात आल्याने या प्रकरणाचा गुंता वाढला होता. बेपत्ता होण्यापूर्वी मिश्रा याला पीडित महिलेचा चुलतभाऊ मिलिंद पाटील याच्यासोबत पाहण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिश्रा याच्या भावाने दिली. या माहितीच्या आधारे पाटील याला ताब्यात घेत कसून चौकशी करण्यात आली. मिश्रा याचा खून केला असल्याची कबुली त्याने दिली. पाटीलने सांगितल्याप्रमाणे पोलिसांनी खोपटा खाडीपलीकडील आवरे व गोवठणे या दोन गावांच्या मध्यभागी असलेल्या खारफुटीत शोध घेतला असता मिश्रा याचा मृतदेह आढळून आला असल्याची माहिती उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र गलांडे यांनी दिली आहे. साहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष सावंत या गुन्हाचा अधिक तपास करीत आहेत.