तालुक्यातील थेरगाव परिसरात वादळी पावसामुळे विजेचे खांब व तारा जमिनीवर पडल्यानंतरही त्यातून विजेचा प्रवाह सुरूच राहिल्याने त्याच्या धक्क्याने शेतात कामासाठी गेलेल्या सुंदराबाई गोपीनाथ शिंदे या महिलेस आपला जीव गमवावा लागला. महावितरणच्या हलगर्जीपणामुळेच या महिलेचा बळी गेल्याचा संताप गावात व्यक्त होत आहे.
थेरगाव परिसरात पावसाने पडलेले विजेचे खांब, तारा उचलून नेण्यात याव्यात म्हणून परिसरातील नागरिकांनी महावितरण कार्यालयास कळवले होते, मात्र महावितरणच्या कर्मचा-यांनी त्याची वेळीच दखल न घेतल्याने या महिलेला जीव गमवावा लागला. सोमवारी सकाळी नेहमीप्रमाणे सुंदराबाई शेतामध्ये काम करण्यासाठी गेल्या असता जमिनीवर पडलेल्या तारांमधील वाहत्या विजेचा धक्का त्यांना बसला. त्यात त्या जागीच ठार झाल्या. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येते.