ठाणे येथील स्थानक परिसरातील स्कायवॉकवर छेड काढून विनयभंग करणाऱ्या एका तरुणास राष्ट्रीय स्तरावरील महिला कबड्डीपटूने पकडून पोलिसांच्या स्वाधीन केल्याचा प्रकार मंगळवारी रात्री घडला असून या प्रकरणी नौपाडा पोलिसांनी त्या तरुणासह त्याच्या मित्रालाही अटक केली आहे. ठाण्यातील चरई भागात राष्ट्रीय स्तरावर कब्बडी खेळणारी एक २२ वर्षीय तरुणी राहते. मंगळवारी रात्री ती मैत्रिणीसोबत ठाणे स्थानक परिसरातील स्कायवॉकवरून बस पकडण्यासाठी जात होती. त्यावेळी दोन तरुणांनी त्यांची छेडछाड करून विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी दोघींनी धाडस दाखवत छेडछाड करणाऱ्या रमेश थोरात (२६, रा. उल्हासनर) याला पकडले व ठाणे वाहतूक पोलिसांच्या हवाली केले. या घटनेनंतर त्याचा साथीदार रितेश घरत (२५) हा पसार झाला होता. या प्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी रितेशला चेंबूर येथून अटक केली.