घरातील पुरुष मंडळींची व्यवस्थित काळजी घेणाऱ्या महिला स्वत:कडे मात्र पुरेसे लक्ष देत नाहीत. शिळे अन्न त्या खातात. घरातील वेगवेगळी कामे करताना व्यायाम, व्यक्तिमत्त्व विकास आदी गोष्टींकडे त्या लक्ष देत नाहीत. त्यातून त्यांना अनारोग्याला सामोरे जावे लागते. हे सर्व टाळण्यासाठी नियमित आहारविहार, चौफेर व्यक्तिमत्त्व घडविणे यासाठी स्वत:कडे पुरेसे लक्ष द्यावे, असे आवाहन डॉ. रोहिणी पाटील यांनी केले.
येथील शासकीय कर्मचाऱ्यांचे सार्वजनिक वाचनालय आणि तक्रार निवारण समिती यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ‘महिलांचे आरोग्य आणि वाचन’ या विषयावर डॉ. पाटील बोलत होत्या. आपले वाचन नियमित आणि निवडक असल्यामुळे आपणाला जगात वावरताना एक व्यापक दृष्टी मिळाल्याचेही डॉ. पाटील यांनी नमूद केले. स्वागत शुभदा देशपांडे यांनी केले. प्रास्ताविक वाचनालयाच्या सांस्कृतिक सचिव मधुरा फाटक यांनी केले. पाहुण्यांची ओळख जयश्री वाघ यांनी करून दिली.