कौटुंबिक वादातून इचलकरंजी येथील विवाहितेने दोन मुलांसह विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. हा प्रकार मंगळवारी नारायण मळा परिसरात घडला. मीरा निवृत्ती वाघमोडे (वय २९), ओंकार निवृत्ती वाघमोडे (वय ७) व काळुबाई निवृत्ती वाघमोडे (वय ४) अशी मृतांची नावे आहेत.    
नारायण मळा येथे डीकेटीई शाळेच्या पिछाडीस खाडपाटील यांची विहीर आहे. पाटील यांचा शेतमजूर सकाळी विहिरीतील पाणी शेतात सोडण्यासाठी गेला होता. तेव्हा त्याला लहान मुलाचा मृतदेह पाण्यावर तरंगतांना दिसला होता. ही माहिती त्याने पोलिसांना दिली. गावभाग पोलीस ठाण्याचे जगन्नाथ पाटील, संभाजी कोगेकर, निवास पोवार, प्रशांत ओतारी यांनी जीवन मुक्ती संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या मदतीने मुलाचा मृतदेह बाहेर काढला. तेव्हा त्यांना पाण्याखाली १२ फुटांवर तारेला अडलेले आणखी दोन मृतदेह दिसले. तेही त्यांनी बाहेर काढले. ही माहिती समजल्यावर जयभीम झोपडपट्टीत राहणारे वाघमोडे कुटुंबीय घटनास्थळी आले. त्यांनी मृतांची ओळख पटविली. शवविच्छेदनानंतर तीनही मृतदेह त्यांच्या ताब्यात देण्यात आले.
दोन दिवसांपूर्वी कौटुंबिक कलह निर्माण झाल्याने मीराबाई दोन मुलांसह घराबाहेर पडली होती. पती व नातेवाइकांनी शोध घेतल्यानंतर ते सापडले नव्हते. आज तिघांचे मृतदेह विहिरीत मिळाले. घटनास्थळी पोलीस उपअधीक्षक प्रकाश देशमुख, पोलीस निरीक्षक रामदास इंगवले, वाहतूक शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक राजू तहसीलदार यांनी भेट देऊन पाहणी केली.