अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टय़ामुळे गेले काही दिवस गुजरातमध्ये मुसळधार पाऊस कोसळत होता. त्या पावसाने गुजरातच्या उत्तर सीमेवरील दमणगंगा चांगलीच दुथडी भरून वाहत होती. या नदीतील एका खडकावर एक महिला अडकल्याची बातमी पाहतापाहता आसपासच्या गावांत पसरली. पाठोपाठ तिला सोडवण्यासाठी (आणि पाहण्यासाठीही!) नदीकिनारी एकच गर्दी उसळली. परंतु निव्वळ किनाऱ्यावर उभे राहून काही करणे कोणालाच शक्य नव्हते. अखेर तटरक्षक दलाला पाचारण करण्यात आले. तटरक्षकांनी मोठय़ा शर्थीने निसर्गाच्या विराट रूपाशी झुंज देत अखेर या महिलेला त्या प्रलयातून सुखरूप बाहेर काढले.
गुजरातेत रविवारपासूनच मुसळधार पावसाने कहर मांडला आहे. या पावसामुळे नद्या प्रचंड फुगल्या आहेत. दमणगंगाही दुथडी भरून वाहत आहे. या नदीच्या मध्यभागी एका खडकावर एक ४५ वर्षीय महिला मंगळवारी सकाळी अडकल्याची माहिती तटरक्षक दलाला मिळाली. तटरक्षक दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मात्र प्रचंड वेगवान प्रवाहात बोट टाकून तिला वाचवणे शक्य नव्हते. पाणी वेगाने वाढत होते. ती महिला उभी असलेला खडक लवकरच पाण्याखील जाण्याची लक्षणे दिसत होते. त्यामुळे तातडीने हालचाल करणे आवश्यक बनले.
अखेर तटरक्षक दलाने हवाई मार्गे तिची सुटका करण्याचे ठरवले. दलाचे हेलिकॉप्टर नदीवर घिरटय़ा मारू लागले. परंतु सोसाटय़ाचा वारा आणि पावसाचाही प्रचंड मारा यामुळे तिला दोराच्या साहाय्याने उचलून घेणे शक्य होत नव्हते. सकाळचे साडेदहा-अकरा वाजले होते, तरी अंधारून आले होते. दलाच्या जवानांनी हेलिकॉप्टरमधून या महिलेच्या दिशेने दोर आणि लाइफ जॅकेट फेकले. मात्र हा पहिला प्रयत्न अयशस्वी ठरला. एव्हाना पाणी त्या खडकावर चढू लागले होते. किनाऱ्यावरील लोक श्वास रोखून ही जीवन-मृत्यू यांमधील लढाई पाहत होते.
पावसाचा मारा जोरात असल्याने हेलिकॉप्टर फार खाली नेता येत नव्हते. मात्र तटरक्षक दलाच्या जवानांनी हार न मानता दुसऱ्यांदा प्रयत्न केला. या वेळी दोरखंड आणि लाइफ जॅकेट महिलेच्या जवळच पडले. तिने सूचनेप्रमाणे ते जॅकेट घातले आणि दोरखंड त्याला व्यवस्थित बांधला. हेलिकॉप्टरमधील जवानांनी हलकेच त्या महिलेला वर उचलण्याची सुरुवात केली. मात्र वाऱ्यापावसामुळे या कामाला तब्बल अर्धा तास लागला. मात्र अखेर जवानांना या महिलेचे प्राण वाचवण्यात यश आले. पुढील काही मिनिटांतच हा खडक पाण्यात दिसेनासा झाला होता.