छत्रपती शिवाजी शासकीय सवरेपचार रुग्णालयात प्रसूतिसाठी आलेल्या महिलेवर उपचार होण्यासाठी मदत नाकारल्याच्या कारणावरून तेथील एका निवासी डॉक्टरला केलेल्या मारहाणप्रकरणी वरिष्ठ पोलीस अधिकारी अरुण वायकर व अन्य दोघे पोलीस निलंबित झाले व त्यांना दहा दिवस न्यायालयीन कोठडीत काढावे लागले. परंतु या प्रकरणात रुग्णाला मदत नाकारल्याचा आरोप असलेल्या संबंधित निवासी डॉक्टरविरुद्ध अद्याप कोणतीही कारवाई न झाल्याने त्याकडे लक्ष वेधण्यासाठी मंगळवारी सकाळी एका तरुणीने डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अधिष्ठातांच्या दालनासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला.
कविता चव्हाण असे या तरुणीचे नाव आहे. तिला पोलिसांनी तत्काळ ताब्यात घेतले व नंतर थोडय़ाच वेळात सोडूनही दिले. कविता चव्हाण यांनी यापूर्वी याच प्रश्नावर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काही दिवस उपोषणही केले होते. परंतु त्याची दखल घेण्यात न आल्याने त्यांनी आत्मदहनाचा इशारा दिला होता. त्यानुसार मंगळवारी सकाळी त्यांनी वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश केला. त्यांनी दिलेला इशारा लक्षात घेऊन पोलिसांनी तेथे बंदोबस्त ठेवला होता. परंतु पोलिसांची नजर चुकवून त्यांनी संरक्षक भिंतीवरून उडी मारून आत प्रवेश केला व थेट अधिष्ठाता डॉ. अशोक शिंदे यांच्या दालनाच्या दिशेने शिरकाव केला. डॉ. शिंदे यांची भेट घेऊन संबंधित निवासी डॉक्टरविरुद्ध कारवाई का झाली नाही, असा जाब विचारला. नंतर आत्मदहनाचा प्रयत्न करताच पोलिसांनी हस्तक्षेप करून त्यांना ताब्यात घेतले. नंतर थोडय़ाच वेळात त्यांना मुक्तही केले.
दरम्यान, शासकीय रुग्णालयातील निवासी डॉक्टर प्रशांत पाटील यांची चौकशी रखडली आहे. पीडित महिलेच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेण्यात आली असता त्यावर अधिष्ठाता डॉ. अशोक शिंदे यांनी उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. प्रांरभी डॉ. प्रशांत पाटील यांच्यावर कारवाई होण्याच्या मागणीसाठी विविध राजकीय व सामाजिक संघटनांनी आंदोलने केल्याच्या पाश्र्वभूमीवर या प्रकरणाच्या चौकशीसाठी त्रिसदस्यीय समिती गठीत केली होती. या समितीत डॉ. व्ही. एन. धडके, डॉ. प्रदीप गाडगीळ व डॉ. पुष्पा अग्रवाल यांचा समावेश होता. परंतु या समितीने तटस्थ राहण्याची भूमिका घेत उच्चस्तरीय चौकशीची शिफारस केली. त्यामुळे चौकशी रखडली आहे.