News Flash

महिला गोविंदा यंदा पंजाबमध्ये

यंदा लाखो रुपयांचे पारितोषिक असलेली उंच दहीहंडी फोडायला मिळणार की नाही, बाल गोविंदांना थरात सहभागी होता येईल की नाही..

| August 20, 2015 04:05 am

यंदा लाखो रुपयांचे पारितोषिक असलेली उंच दहीहंडी फोडायला मिळणार की नाही, बाल गोविंदांना थरात सहभागी होता येईल की नाही, रस्त्यामध्ये दहीहंडी बांधता येणार की नाही असे एक ना अनेक प्रश्न गोविंदा पथके आणि उत्साव आयोजकांना पडलेले असताना दहीहंडी फोडण्यासाठी पंजाबला जाण्याची तयारी भारतातील पहिल्या महिला गोविंदा पथकातील गोपिका करीत आहेत. महाराष्ट्र सरकारचे दहीहंडीबाबतचे धोरण आणि नियमांचे तेथे काटोकोरपणे पालन करण्याचा निश्चय या पथकाने केला आहे. या निमित्ताने यंदा महाराष्ट्राच्या संस्कृतिचे पंजाबमध्ये दर्शन घडणार आहे.दरवर्षी दहीहंडी उत्सवात केवळ बघ्याची भूमिका घेणाऱ्या महिलांनाही दहीहंडी फोडण्याची संधी मिळायला हवी या उद्देशाने १९९५ मध्ये प्रबोधन कुर्ला या संस्थेच्या माध्यमातून भाऊ कोरगावकर यांनी गोरखनाथ महिला गोविंदा पथकाची मुहूर्तमेढ रोवली. महिला कशी काय हंडी फोडणार असा प्रश्न करीत अनेकांनी नाके मुरडली. पण प्रत्यक्ष दहीकाल्याच्या दिवशी या पथकातील महिलांना दहीहंडी फोडताना पाहून टीका करणाऱ्यांची तोंडे बंद झाली. त्यानंतर हळूहळू मुंबईमध्ये महिला गोविंदा पथकाची संख्या आणि चुरस वाढू लागली. उंच दहीहंडी फोडण्याच्या चुरशीत थर कोसळून महिला जायबंदी होऊ नयेत यासाठी केवळ पाच थरांची हंडी फोडायची असा भाऊ कोरगावकर यांचा दंडक होता. परंतु इतर महिला गोविंदा पथके उंच दहीहंडी फोडू लागल्याने गोरखनाथ महिला गोविंदा पथकातील महिला त्याकडे आकर्षित होऊ लागल्या. पण भाऊ कोरगावकर यांनी त्यास स्पष्ट नकार दिला.
उंच दहीहंडी फोडण्याच्या जीवघेण्या स्पर्धेपासून दूर राहण्यासाठी भाऊ कोरगावकर यांनी शक्कल लढविली. दरवर्षी परराज्यातील श्रीकृष्णाच्या मंदिराबाहेर दहीहंडी फोडून दहीकाला साजरा करण्याचा त्यांनी निर्णय घेतला. त्यामुळे पथकातील मुली-महिलांना परराज्यांची वारीही घडेल असा त्यामाचा एक उद्देश होता. या निर्णयावर शिक्कामोर्तब करीत २००७ मध्ये हे पथक द्वारकेला रवाना झाले. त्यानंतर निप्पाणी, डाकोर, उडुपी, जयपूर, मथुरा, उज्जन, वाराणसी या ठिकाणी दहीहंडी फोडून या पथकाने महाराष्ट्राच्या उत्सवाचे दर्शन या राज्यांतील मंडळींना घडविले. यंदा दहीहंडी उत्सवाबाबत पथकांमध्ये संभ्रम आहे. पण त्या संभ्रमापासून दूर असलेले हे पथक यंदा पंजाबमधील अमृतसहमध्ये दहीहंडी फोडण्यासाठी जाणार आहेत. अमृतसरला जाण्यासाठी हे पथक २ सप्टेंबरला मुंबईतून रवाना होणार आहे. या पथकाची खडूर गावात वास्तव्याची व्यवस्था करण्यात आली आहे. जन्माष्टमीच्या दिवशी, ५ सप्टेंबर रोजी मध्यरात्री अमृतसरमधील कृष्ण मंदिराबाहेर बांधण्यात येणारी मानाची दहीहंडी हे पथक फोडणार आहे. कालाष्टमीच्या दिवशी (६ सप्टेंबर) अमृतसरमध्ये या पथकासाठी पाच-सहा दहीहंडय़ा बांधण्यात येणार आहेत. संध्याकाळी दुर्गान्या मंदिराबाहेरील दहीहंडी फोडून गोविंदा पथक मुंबईच्या दिशेने प्रस्थान ठेवणार आहेत. अमृतसर दौऱ्यामध्ये तेथील मंडळी पंजाबच्या संस्कृतीचे, तर हे पथक महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन परस्परांना घडविणार आहेत.

दहीहंडीच्या निमित्ताने मुंबई-ठाण्यात जीवघेणी स्पर्धा सुरू आहे. मोठय़ा रकमांच्या बक्षिसांच्या आमिषापोटी तरुण-तरुणी विनाकारण साहस करीत आहेत. त्यामुळेच आता उत्सवावर बंधने आली आहेत. आम्ही परराज्यात दहीहंडी फोडणार असलो तरी राज्य सरकारच्या नियमांचे तेथेही पालन करू. २० फुटापेक्षा उंच दहीहंडी फोडणार नाही आणि पथकामध्ये सहभागी होणाऱ्या १२ ते १५ वर्षे वयोगटातील मुलींच्या पालकांकडून लेखी परवानगीही घेणार आहोत. मुंबईतील गोविंदा पथकांनीही नियमांचे पालन करावे आणि विनाकारण धोका पत्करू नये.
भाऊ कोरगावकर
अध्यक्ष, गोरखनाथ महिला गोविंदा पथक

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 20, 2015 4:05 am

Web Title: women dahi handi will in punjab
Next Stories
1 ‘कॉमनवेल्थ’ शिष्यवृत्तीवर डोंबिवलीतील विवेकची मोहर
2 खासगी कंपन्यांनाही आता ‘बेस्ट’ सेवा
3 तरुणाच्या हत्येनंतर तीन तासांत आरोपींना अटक
Just Now!
X