News Flash

नागरिकांच्या संवेदना हरविलेल्या..

वाहन चालविताना समोरच्या वाहनांना हरविण्याच्या स्पर्धेमध्ये आजकाल चालकांची स्पर्धा लागली आहे. मात्र दिवसाढवळ्या डोळ्यासमोर अपघात झाल्यानंतर तडफडणाऱ्यी जखमी व्यक्तींप्रति सुसाट वाहनचालकाचा गाडीक्रमांकही पोलिसांना न कळविणारे

| May 21, 2014 07:25 am

वाहन चालविताना समोरच्या वाहनांना हरविण्याच्या स्पर्धेमध्ये आजकाल चालकांची स्पर्धा लागली आहे. मात्र दिवसाढवळ्या डोळ्यासमोर अपघात झाल्यानंतर तडफडणाऱ्यी जखमी व्यक्तींप्रति सुसाट वाहनचालकाचा गाडीक्रमांकही पोलिसांना न कळविणारे बधिर प्रवासी आणि संवेदनशून्य वाहनचालक आजकालच्या घोडदौडीत पाहायला मिळतात. याचा प्रत्यय पनवेल ते सायन मार्गावर खांदेश्वर पुलावर सोमवारी सायंकाळी साडेचार वाजता झालेल्या अपघातामध्ये कामोठे पोलिसांना आला.
पनवेलच्या नांदगाव या गावातील नंदा फडके या नातेवाइकाच्या लग्नसमारंभासाठी पहिली वेळ स्कुटी दुचाकीवर बसून भावासोबत जात असताना भरधाव वेगात येणाऱ्या अवजड वाहनाने फडके भाऊबहिणीला ठोकर दिली. या अपघातामध्ये नंदा फडके हिला आपला जीव गमवावा लागला. नंदा यांना कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले, मात्र तोपर्यंत वेळ निघून गेली होती. रविवारच्या दिवसाच्या लख्ख प्रकाशात हा अपघात झाला.  
खांदेश्वर थांब्यावर बस आणि मिनीडोअरसाठी थांबलेले प्रवासी असतात. या सर्वापासून काही अंतरावर हा अपघात घडला. अनेकांनी हा अपघात डोळ्यासमोर पाहिला. साडेचार वाजता झालेल्या अपघातामधील फरारी अवजड वाहनाचा क्रमांक कोणीही टिपला नाही. पोलिसांना या अपघाताची माहिती देण्यासाठी कोणीही पुढाकार घेतला नाही.
कामोठे एमजीएम रुग्णालयात नंदा यांच्या मृत्यूनंतर तब्बल साडेतीन तासांनी कामोठे पोलिसांना या घटनेविषयी समजले. त्यानंतर पोलिसांनी फरारी वाहनाचा शोध सुरू केला. या अपघातामध्ये नंदा यांच्या ५४ वर्षांचे भाऊसुद्धा जबर जखमी झाले आहेत. १८ तास उलटले तरीही पोलिसांना या अपघाताबद्दल कोणताच सुगावा मिळाला नाही. पोलिसांच्या दफ्तरी नंदा यांचा वैद्यकीय अहवाल, घटनास्थळावरील पंचनाम्याव्यतिरिक्त कोणताही कागद जमवता आला नाही. नागरिकांना रस्त्यावर चालण्याचा असणारा हक्क आणि वाहनचालकांना काही काळासाठी मिळणारा वाहकाचा परवाना याचा विसर वाहनचालकांना पडल्यामुळे हे अपघात वाढल्याचे मत पोलिसांनी व्यक्त केले आहे.
स्पर्धा स्वत:शी, वाहनांशी की घडय़ाळांच्या काटय़ाशी अशा तिहेरी कात्रीत हे चालक वेगाच्या धुंदीत वाहने चालवितात. मात्र डोळ्यांसमोरील घडणाऱ्या अपघातांमध्ये जागरूक प्रवासी, वाहनचालकाची जागरूकता हरवल्याची खंत पोलिसांनी नंदा फडके यांच्या अपघातानंतर व्यक्त केली.
सोमवारी पनवेल-खांदेश्वर मार्गावर खांदेश्वर पुलावर झालेल्या अपघाताविषयी कोणास माहिती असल्यास पोलीस उपनिरीक्षक समाधान भजबजकर यांच्याशी ८६८९८८०७४५ या भ्रमणध्वनीवर संपर्क करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. माहिती देणाऱ्या जागरूक नागरिकाचे नाव गुप्त ठेवण्यात येईल, असेही पोलिसांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 21, 2014 7:25 am

Web Title: women died due to not getting medical help on time
टॅग : Death
Next Stories
1 करंजा-उरण रस्त्याची दुरुस्ती होणार ?
2 पोलीस ठाण्याला पर्यायी जागा उपलब्ध करून देणार
3 सोनसाखळी चोरटय़ांचेही खबरी..!
Just Now!
X