परळ येथील केईएम रुग्णालयात आपला वैद्यकीय अहवाल घेण्यासाठी आलेल्या एका महिला रुग्णाने रुग्णालयातील महिला डॉक्टरला मारहाण केल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली. या महिला रुग्णाविरोधात तक्रार दाखल करण्यात आली असली, तरी तिला अद्याप अटक करण्यात आलेली नाही.
केईएम रुग्णालयातील यूरॉलॉजी विभागाच्या ऑपरेशन थिएटरमध्ये फरिदा शेख (४५) ही महिला आपला वैद्यकीय चाचणी अहवाल घेण्यासाठी आली. त्या वेळी या महिलेची वैद्यकीय चाचणी करणाऱ्या डॉ. अनघा कुलकर्णी यांनी तिला अहवाल चार वाजता मिळेल, असे सांगितले. मात्र या रुग्ण महिलेने अत्यंत उद्धटपणे बोलण्यास सुरुवात करत इतर रुग्णांचा वैद्यकीय अहवाल असलेली फाइल घेऊन तेथून निघून जाण्यास सुरुवात केली. त्या वेळी डॉ. कुलकर्णी यांनी तिला थांबवण्याचा प्रयत्न केला असता तिने डॉ. कुलकर्णी यांच्या कानाखाली मारल्या.
या अचानक झालेल्या हल्ल्यानंतर इतर रुग्णांचे नातेवाईक आणि डॉ. कुलकर्णी यांचे सहकारी मध्ये पडले. सहकाऱ्यांनी सुरक्षा अधिकाऱ्यांना बोलावल्यावर या महिलेने डॉक्टरांनीच आपल्याला मारहाण करण्याचा प्रयत्न केल्याची उलटी बोंब मारली. अखेर सुरक्षा रक्षकांच्या मदतीने या महिलेला जवळच्या पोलीस ठाण्यात नेण्यात आले. पण तिथे तिचे नातेवाईक जमा झाले आणि महिलेच्या छातीत दुखत असल्याचे सांगत तक्रार दाखल होण्याआधीच तिला पोलीस ठाण्याबाहेर घेऊन निघून गेल्याचे रुग्णालय सूत्रांनी सांगितले.