News Flash

‘सुपरवुमनगिरी’ पडतेय भारी!

आय डोन्ट थिंक वुमन कॅन हॅव इट ऑल.. घर आणि करिअर अशी कसरत करणाऱ्या महिलांचे हे दु:ख पेप्सिको या बहुराष्ट्रीय कंपनीच्या सीईओ इंद्रा नुयी यांनी

| January 13, 2015 07:56 am

– महिलांच्या आरोग्याच्या तक्रारी वाढल्या
– व्यायाम-प्रकृतीकडे दुर्लक्ष
आय डोन्ट थिंक वुमन कॅन हॅव इट ऑल.. घर आणि करिअर अशी कसरत करणाऱ्या महिलांचे हे दु:ख पेप्सिको या बहुराष्ट्रीय कंपनीच्या सीईओ इंद्रा नुयी यांनी एका मुलाखतीत मांडले तेव्हा त्यावर बरीच उलटसुलट चर्चा झाली होती, कारण आपल्याकडे आजकाल महिलांना दुर्गा, लक्ष्मी यांच्याबरोबरच ‘सुपरवुमन’ हे नवे आधुनिक विशेषण लावले जाते, त्यामुळे करिअरकेंद्री महिलांची होणारी ओढाताण नुयी यांच्यासारख्या जगातील मोजक्या प्रभावशाली महिलांच्या मांदियाळीपैकी एक असलेल्या महिलेने उघड केली तेव्हा सर्वाच्याच भुवया उंचावल्या; पण ‘सुपरवुमन’ वगैरे असे काही नसते. उलट करिअर तर सोडाच, पण केवळ आपल्या घरातील उत्पन्नाला हातभार लावण्याच्या माफक उद्देशाने १० ते ५ अशी ‘नोकरी एके नोकरी’ करणाऱ्या महिलांनाही ही ‘सुपरवुमनगिरी’ भारी पडते आहे, कारण या नोकरी आणि घर अशी कसरतीची मोठी किंमत महिलांना आपले आरोग्य देऊन मोजावी लागते आहे.
हाताशी सर्व प्रकारच्या आधुनिक सोयी, नोकरचाकर असलेल्या नोयी यांचे हे दु:ख, तर सामान्य महिलांचे काय? नेमका हाच प्रश्न घेऊन निर्मला निकेतन या समाजकार्य विषयात शिक्षण देणाऱ्या संस्थेतील एक प्राध्यापिका डॉ. सामन अफरोज यांनी एक पाहणी केली. बदलत्या कुटुंबव्यवस्थेवर ‘टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ सोशल स्टडीज’ने आयोजिलेल्या एका परिषदेत अफरोज यांनी हा पाहणी अहवाल सादर केला होता. त्यात समोर आलेले वास्तव धक्कादायक आहे.
या पाहणीत मुंबईतील १५० नोकरदार महिला आणि गृहिणी अशा दोन्ही प्रकारच्या महिलांना बोलते करण्यात आले. यात दोन्ही प्रकारांतील प्रत्येकी ७५ महिलांचा समावेश होता. नोकरदार महिलांपैकी ५५ टक्के महिलांना अनेक मोठय़ा आरोग्यविषयक तक्रारींना तोंड द्यावे लागते आहे. यात सांधेदुखी, तीव्र डोकेदुखी, अस्थमा आणि मधुमेह या आजारांचा समावेश होता. याशिवाय लहानमोठय़ा आरोग्यविषयक कुरबुरीही होत्याच. तुलनेत गृहिणींपैकी लहानमोठय़ा आजारांनी त्रस्त असलेल्या महिलांचे प्रमाण ४५ टक्के होते.
या पाहणीतील महिला विविध उत्पन्न गटांतील होत्या. ज्यांचे उत्पन्न एक लाखाहून अधिक होते, अशा कुटुंबांतील महिलांना जास्त आजारांना तोंड द्यावे लागते आहे. एक लाख ते ५० हजार किंवा ५० हजारांहून कमी उत्पन्न गटातील महिलांना होणारा त्रास तुलनेत कमी होता. नोकरदार महिलांना वेळेच्या कमतरतेमुळे स्वत:साठी वैद्यकीय उपचार घ्यायलाही वेळ नसतो. तुलनेत गृहिणींकडे खर्च करण्यासाठी स्वत:चा पैसा नसला तरी त्यांना उपचारांकरिता वेळेची अडचण येत नाही. वेळेअभावी नोकरदार महिलांना व्यायामाकडेही लक्ष देता येत नाही, कारण ७५ पैकी केवळ ३५ टक्के महिलाच वेळेत वेळ काढून व्यायाम करीत असल्याचे आढळून आले. तुलनेत गृहिणींपैकी ६५ टक्के तरी या ना त्या प्रकारे व्यायामाला वेळ देऊ शकत होत्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 13, 2015 7:56 am

Web Title: women health issues increases
टॅग : Loksatta,News
Next Stories
1 वाळवणासाठी जागेची टंचाई
2 सर्वात महागडे ‘कुकबुक’
3 पै फ्रेंड्स लायब्ररीची ‘लक्ष्यपूर्ती’!
Just Now!
X