सोलापूर जिल्हय़ातील प्राथमिक आरोग्य केंद्रांची होणारी दुरवस्था, तेथील वैद्यकीय अधिका-यांचे सातत्याने गैरहजर राहणे, औषधांचा तुटवडा या प्रश्नांवर जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेत महिला सदस्यांनी आक्रमक पवित्रा घेत पदाधिका-यांना व प्रशासनाला धारेवर धरले. महिला सदस्या अभ्यासूवृत्तीने व तेवढय़ाच तळमळीने प्रश्न मांडत असताना पीठासनावर आरूढ झालेले काही पदाधिकारी त्याकडे गांभीर्य न पाहता आपापसात गप्पा मारताना व टिंगळटवाळी करताना आढळल्यामुळे संतप्त महिला सदस्यांनी बेजबाबदार पदाधिका-यांना खडेबोल सुनावावे लागले.
जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेचे कामकाज मंगळवारी दुपारी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. निशिगंधा माळी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. या वेळी राष्ट्रवादीचे सर्जेराव बागल यांनी जिल्हय़ातील जि.प.च्या अखत्यारीतील प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या परिस्थितीवर सभागृहाचे लक्ष वेधले. माढा तालुक्यातील रोपळे येथील बेजबाबदार वैद्यकीय अधिका-यावरील कारवाईचा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. त्यानंतर याच मुद्यावर बार्शी तालुका पंचायत समितीच्या सभापती कौसल्या माळी यांनी भाग घेताना बार्शी तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांतील दुरवस्था मांडली. अनेक आरोग्य केंद्रांमध्ये वैद्यकीय अधिकारी जागेवर नसतात, त्या ठिकाणी औषधांचा तुटवडा नेहमीच होतो. त्यामुळे सामान्य गोरगरीब रुग्णांचे हाल होतात व त्यांनी विनाकारण आर्थिक भरुदड सोसावा लागतो. त्यामुळे जिल्हा परिषदेची आरोग्य यंत्रणा कुचकामी ठरल्याची तक्रार त्यांनी केली. काँग्रेसच्या साधना देशमुख, राणी दिघे (अपक्ष, सांगोला), सीमा पाटील (राष्ट्रवादी, मोहोळ) आदींनी पोटतिडकीने चर्चेत सहभागी होत आरोग्य केंद्रांचा प्रश्न लावून धरला. इतर विकासाच्या कामांची पूर्तता दोन-दोन वर्षे होत नसल्याची त्यांची तक्रार होती. मात्र या महिला सदस्या भाष्य करीत असताना दुसरीकडे पीठासनावर स्थानापन्न झालेले पदाधिकारी गांभीर्याने न घेता एकमेकात गप्पा मारताना, हास्यविनोद करताना दिसून आले. त्यामुळे या पदाधिका-यांना आक्रमक महिला सदस्यांनी चांगलेच खडसावले. जि. प. अध्यक्ष डॉ. निशिगंधा माळी यांनी तरी आपल्या सहकारी पदाधिका-यांना समज देणे अपेक्षित होते. जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद महिलेकडे असताना महिला सदस्यांना अवमान सहन करावा लागला.
बार्शीच्या सभापती कौसल्या माळी या प्रश्नावर बोलत असताना त्यांना अध्यक्ष डॉ. माळी यांनी रोखण्याचा प्रयत्न केला असता काँग्रेसचे उमाकांत राठोड, राष्ट्रवादीचे धैर्यशील मोहिते-पाटील, विरोधी पक्षनेते संजय पाटील यांच्यासह बहुसंख्य सदस्यांनी त्यास जोरदार हरकत घेत महिला सदस्यांना बोलू द्या, त्यांच्या अधिकारावर गदा आणू नका, अशा शब्दांत अध्यक्षांना सुनावले.
या वेळी सांगोला पंचायत समितीच्या सभापती ताई मिसाळ व शेकापच्या कमल कोळेकर यांनी अभ्यासूपणे व नेटाने विकासाचे प्रश्न मांडले. शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी बसविण्यात येणारी बायोमेट्रिक यंत्रणा निर्णय होऊनदेखील अद्याप का अमलात आली नाही? तसेच शाळांना संगणक उपलब्ध करून देण्याचा निर्णय कोठे अडकला, असा सवाल ताई मिसाळ यांनी उपस्थित केला असता असमाधानकारक उत्तरे मिळाल्याने ताई मिसाळ व कमल कोळेकर आक्रमक झाल्या. शिक्षण समितीचे सभापती शिवानंद पाटील यांनी येत्या दोन महिन्यांत संगणक उपलब्ध करून दिले जातील, असे स्पष्ट केले. मात्र दहा महिने संगणक खरेदी झाली नाही, तर येत्या दोन महिन्यांत कशी होईल? इतर जिल्हा परिषदांनी संगणक खरेदी केले असून त्यांना तांत्रिक मान्यतेला विलंब कसा लागला नाही, असे प्रतिप्रश्न विचारून मिसाळ व कोळेकर यांनी पदाधिकारी व प्रशासनाला धारेवर धरले. जिल्हा परिषदेच्या विविध विभागनिहाय होणा-या कामांवर झालेला खर्च व शिल्लक निधीचा प्रश्नही या दोघी महिला सदस्यांनी धीटपणे मांडला. त्यांना इतरांनी तेवढीच साथ दिली. मोहोळच्या शीतल पाटील यांनी वस्ती शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी पाणी उपलब्ध नसल्याच्या प्रश्नाकडे लक्ष वेधले. त्यावर तशी आर्थिक तरतूदच असल्याची कबुली शिक्षण समितीच्या सभापतींना द्यावी लागली.