सोलापूर शहर व परिसरात अलीकडे दिवसाढवळ्या महिलांचे दागिने लुटण्याचे प्रकार प्रचंड प्रमाणात वाढल्यामुळे महिलांची सुरक्षितताच धोक्यात आली आहे. त्यावर मात करण्यासाठी यंत्रणेवर विसंबून न राहता महिलांनी स्वयंसिध्दा होणे गरजेचे आहे, असे मत काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केले.
शहरात महिलांचे दागिने चोरीला जाण्याचे प्रमाण वाढल्याच्या पाश्र्वभूमीवर असे प्रकार टाळण्यासाठी स्वत: खबरदारी घेण्याच्या अनुषंगाने करावयाच्या उपाययोजना यासंदर्भात प्रबोधनपर माहिती पत्रिका काढण्यात आल्या. या माहिती पत्रिकांचे प्रकाशन आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले; त्या वेळी त्या बोलत होत्या. सखी सारथी फाउंडेशन व पूर्व विभाग ताता गणपती सांस्कृतिक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला. महापौर अलका राठोड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास शोभना सागर, सुरेखा बोमडय़ाल, ताता गणपती मंडळाचे अध्यक्ष गौरीशंकर कोंडा आदींची प्रमुख उपस्थिती होती. माहिती पत्रिका काढण्याची संकल्पना गौरीशंकर कोंडा यांची असून, त्यातील चित्रे राहुल शिंदे (औरंगाबाद) यांनी रेखाटली आहेत.
चोरांपासून सावध राहण्यासाठी महिलांनी घराबाहेर पडताना सोबत लेदर बॉल व मिरचीची पूड बाळगावी. चोरांचा प्रतिकार करण्यासाठी या वस्तूंचा वापर करावा, असे आवाहन करीत आमदार शिंदे म्हणाल्या, स्वसंरक्षणासाठी महिलांनी आता खास प्रशिक्षण घेण्याची गरज निर्माण झाली असून सामाजिक संस्थांनी यासंदर्भात खास पुढाकार घेऊन कार्यशाळा घ्याव्यात, अशी सूचनाही त्यांनी केली. या प्रसंगी महापौर अलका राठोड व शोभना सागर यांनीही मनोगत मांडले. सखी सारथी फाउंडेशनचे अध्यक्ष श्रीनिवास बुरा यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. रेणुका बुधारम यांनी सूत्रसंचालन केले, तर राजेंद्र कट्टा यांनी आभार मानले.