समाजात महिलांवरील अत्याचारात वाढ होत असून नवी दिल्लीत घडलेल्या तरूणीवरील सामूहिक बलात्काराच्या घटनेने संपूर्ण देश हादरला आहे. या घटनेमुळे जनजागृती होत असली तरी महिलांवरील अन्याय, अत्याचार रोखण्यात पोलीस प्रशासनाची मनोभूमिका महत्त्वाची आहे. महिलांना पोलीस ठाणे म्हणजे स्वत:चे माहेर वाटले पाहिजे. सर्वसामान्यांनाही आधार वाटला पाहिजे, अशी वर्तणूक पोलिसांनी ठेवली पाहिजे, अशी अपेक्षा राज्याचे माजी पोलीस महासंचालक अरविंद इनामदार यांनी व्यक्त केली.
बार्शी येथे रवी क्लासेस व अॅकॅडमीच्यावतीने राजमाता जिजामाता व स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त आयोजित व्याख्यानमालेत इनामदार बोलत होते. महिलांवरील होत असलेल्या अत्याचाराबद्दल बोलताना इनामदार यांनी नवी दिल्लीतील तरूणीवर झालेला सामूहिक बलात्कार व नंतर तिच्या झालेल्या मृत्यूबद्दल संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. अशा बलात्कारी गुन्हेगारांना फोडून काढून जास्तीत जास्त कठोर शिक्षा दिली पाहिजे. मुलांनी मुलींची चेष्टा करणे, छेड काढणे म्हणजे काही पराक्रम गाजविणे नव्हे. पराक्रम गाजविण्यासाठी तरूणांना अनेक क्षेत्रे उपलब्ध आहेत. नेता व जनतेच्या चारित्र्यावरच देशाचे भवितव्य अवलंबून आहे. हीच खरी देशाची संपत्ती आहे. प्रत्येकाने स्वत:चे चारित्र्य स्वच्छ ठेवले पाहिजे. जीवनात कधीही मूल्य, सद्गुण व परिश्रमाशिवाय काहीही मिळत नाही, असे मत त्यांनी नोंदविले.