देशाच्या घटनेने स्त्री आणि पुरुष यांना समान अधिकार दिले आहेत. असे असूनही महिलेकडे पाहण्याचा पुरुषांचा दृष्टिकोन अजूनही बदललेला नाही. स्त्री भ्रूणहत्या, हुंडाबळी, विनयभंग आणि बलात्कार असे प्रसंग घडत असून कायदे कडक केल्यास महिलांवरील अत्याचाराला प्रतिबंध बसेल, असे मत माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी गुरुवारी व्यक्त केले. केवळ सरकारने कायदे करून अत्याचार पूर्णपणे थांबतील असे नाही, तर त्याला समाजाने नीतिमत्ता उंचावण्याचे प्रयत्न केले पाहिजेत, असेही त्यांनी सांगितले.
शिवप्रेमी जन जागरण समितीतर्फे आयोजित सावित्री-जिजाऊ व्याख्यानमालेचे उद्घाटन प्रतिभा पाटील यांच्या हस्ते झाले. सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव, माजी आमदार कमल ढोले-पाटील, ज्येष्ठ कार्यकर्त्यां हिराताई चिपळूणकर, उद्योजिका उषा संजय काकडे, नगरसेविका मीनल सरवदे, जिजामाता सहकारी बँकेच्या संस्थापिका मालती शिरोळे, अध्यक्षा स्मिता यादव, कादंबरी रासकर याप्रसंगी उपस्थित होत्या.  प्रतिभा पाटील म्हणाल्या, दिल्लीमध्ये नुकत्याच झालेल्या दुर्दैवी घटनेमुळे आपल्याला चिंता वाटणे स्वाभाविक आहे. केवळ चिंता करण्यापेक्षा चिंतन आणि त्यातून कृती होणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी पुरुषांनी पुढाकार घेतला पाहिजे. सावित्रीबाईंनी केलेल्या स्त्री शिक्षणाच्या कार्यामध्ये महात्मा फुले यांनी पुढाकार घेतला होता. त्यामुळे समाजरथाची दोन चाके असलेल्या स्त्री आणि पुरुष अशा दोघांनी मिळून काम करण्याची गरज आहे. शारीरिक  दुर्बलता घालवून मानसिक कणखर होण्यासाठी महिलांनी ज्युदो-कराटे शिकण्याची आवश्यकता आहे. या वेळी त्यांनी जिजाऊ आणि सावित्रीबाईंच्या कार्याचा गौरव केला.