तालुक्यातील कांचनगाव येथील शाळेच्या जुन्या पत्र्याची चोरी केल्याच्या संशयावरून मध्यरात्री आपणास चौकशीसाठी घोटी पोलीस ठाण्यात आणणाऱ्या पोलिसांवर कारवाई करावी, अशी मागणी महिला सरपंचाने जिल्हा पोलीस अधीक्षक संजय मोहिते यांच्याकडे आणि आदिवासी विकासमंत्र्यांकडे केली आहे. या पोलिसांवर कारवाई न झाल्यास उपोषण करण्याचा इशारा सरपंचाने निवेदनाद्वारे दिला आहे. कांचनगाव येथील मराठी शाळेचे जुने पत्रे सुरक्षिततेसाठी सरपंच मीराबाई आगिवले यांनी आपल्या घरासमोर ट्रॅक्टरमध्ये ठेवले असताना कोणीतरी पोलिसांना फोन करून सरपंचाने शाळेचे साहित्य चोरल्याची तक्रार केली. पोलिसांनी कोणतीही शहानिशा न करता या महिला सरपंचाला मध्यरात्री चौकशीसाठी पोलीस ठाण्यात आणले होते. कोणत्याही महिलेला व १८ वर्षांआतील मुलाला सूर्यास्तानंतर आणि सूर्योदयापूर्वी पोलीस ठाण्यात चौकशीसाठी आणता येत नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश असताना घोटी पोलिसांनी न्यायालयाच्या आदेशाची पायमल्ली केली. न्यायालयाचे आदेश पायदळी तुडविणाऱ्या घोटी ठाण्यातील संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी व्यथित महिलेने निवेदनात केली आहे.