श्रीरामपूर आगारात गैरसोयीच अधिक
देशभरात महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या पाश्र्वभूमीवर ग्रामीण भागातील विद्यार्थिनींमध्ये आधीच भीतीचे वातावरण पसरले आहे. आज श्रीरामपूर बस आगाराने सायंकाळची कारेगाव बस रद्द करीत विद्यार्थिनी व महिलांची गैरसोय करून त्यात भर घातली. संतप्त विद्यार्थी-विद्यार्थिनींनी नियंत्रण कक्षात घुसून अधिकारी, कर्मचाऱ्यांना धारेवर धरले, मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नाही. अखेर राष्ट्रवादीचे सिद्धार्थ मुरकुटे यांनी विद्यार्थिनींसाठी खासगी गाडीची व्यवस्था केल्याने पालकांचा जीव भांडय़ात पडला.  श्रीरामपूर बसस्थानकातून दररोज सायंकाळी ६ वाजता श्रीरामपूर-खिर्डी- कारेगाव बस आहे. मात्र जून-ऑगस्ट २०१२ दरम्यान अनेकदा ही बस रद्द करण्यात येऊन विद्यार्थी-विद्यार्थिनी व प्रवाशांचे हाल करण्याचे सत्र आगाराकडून होत आहे. ‘छावा’चे जिल्हाध्यक्ष नितीन पटारे यांच्या नेतृत्वाखाली त्यावेळी आंदोलन करण्यात आल्याने तत्कालीन आगार व्यवस्थापक खांडेकर यांनी बसला उशीर वा रद्द न होऊ देण्याचे लेखी आश्वासन दिले. त्यानंतर काही महिने बस वेळेवर गेली. मात्र, गेल्या महिनाभरापासून आगाराने पुन्हा बस रद्द करण्याचा सपाटा सुरू केला. पालकांनी अनेकदा आगारप्रमुखांकडे तक्रारी केल्या; पण दखल घेतली गेली नाही.  घटनेची माहिती मिळताच राष्ट्रवादीचे युवक जिल्हाध्यक्ष सिद्धार्थ मुरकुटे घटनास्थळी आले. यावेळी आगारातील जबाबदार अधिकारी उपस्थित नव्हते. फोनही बंद होते. मुरकुटे यांनी विद्यार्थिनींसाठी खासगी वाहनाची व्यवस्था केली व त्यांना सुखरूप घरी पोहचविले.