प्रशासन सुस्त, पोलीसही निवांत
सरकारच्या ताब्यातील मोकळा भूखंड वाचविण्यासाठी नागरिक आणि विशेषत: महिला पुढाकार घेत असतानाही वेगवेगळी कारणे सांगत प्रशासनच सुस्त राहते आणि संबंधित पोलीसही निवांत राहतात, असा संतापजनक अनुभव सध्या गोरेगाव (पूर्व) येथे आरे कॉलनीमधील दूधसागर वसाहतीमधील नागरिक घेत आहेत.
संपूर्ण आरे वसाहतीला दोन वर्षांपूर्वी कुंपण भिंत घालण्यात आली आहे. पश्चिम द्रुतगती मार्गालगत माजी सरकारी कर्मचाऱ्यांची ‘दूधसागर वसाहत’ ही आरे वसाहतीच्या हद्दीतच आहे. या वसाहतीला लागून सुमारे ५० फूट रुंद आणि २०० मीटर लांबीचा भूखंड मोकळा आहे. या भूखंडाच्या कडेने कुंपण भिंत घालण्यात आरे कॉलनी प्रशासनाला अद्याप यश आलेले नाही. ही भिंत घालून हा भूखंड बंदिस्त करावा, अशी मागणी दूधसागर वसाहतीतील नागरिक आणि विशेषत: महिला अनेक महिन्यांपासून करीत आहेत.
हा भूखंड आपल्या नावे आहे, असा दावा या परिसरातील काँग्रेसचे महापालिका निवडणुकीतील पराभूत उमेदवार दळवी यांनी केला आहे. मात्र रहिवाशांचे म्हणणे वेगळेच आहे. १९६९ साली सरकारने ‘दूधसागर’ला या भूखंडासह जमीन देऊ केली होती. परंतु या भूखंडावरून उच्च दाबाची वीजवाहिनी जात असल्याने नियमानुसार तेथे बांधकाम शक्य नाही. त्यामुळे ‘दूधसागर’ने तो भूखंड ताब्यात घेतला नाही. हा भूखंड आरे कॉलनीचा अविभाज्य भाग आहे. प्रॉपर्टी कार्डवरही सरकारचेच नाव आहे. त्यामुळेच तेथे भिंत बांधून तो वाचवावा अन्यथा त्याच्या बाजूलाच उभ्या राहिलेल्या झोपडय़ांचा या भूखंडावरही शिरकाव होईल, असे रहिवाशांचे म्हणणे आहे.
परंतु भिंत बांधण्यास सार्वजनिक बांधकाम विभागाचे कर्मचारी आले की त्यांनी दमदाटी करून पळवून लावले जाते. भिंत बांधण्याची ऑर्डर केवळ नावापुरती काढली जाते. त्यानुसार कंत्राटदारही केवळ दाखविण्यापुरता जागेवर येतो आणि आणि आधीच ठरल्याप्रमाणे गुंड त्यांना धाक दाखवून पळवून लावतात. हा प्रकार अनेकदा झाला असून आरे प्रशासन, सार्वजनिक बांधकाम खाते आणि आरे पोलीस ठाणे यांच्या ‘परस्पर सामंजस्या’नेच हे आजवर होत आले आहे, असा रहिवाशांचा आरोप आहे. या पाश्र्वभूमीवर अखेर दूधसागरमधील महिलांनीच पुढाकार घेऊन कामगारांना संरक्षण देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार सोमवारपासून महिलांच्या ‘देखरेखी’खाली या भिंतीच्या कामाला सुरुवात झाली. आतातरी संरक्षणासाठी पोलीस पुढे येतात का, असा प्रश्न दूधसागरमधील रहिवाशांना पडला आहे.