शहापूर (ता.हातकणंगले) येथे एका महिलेचा खून झाल्याचा प्रकार सोमवारी उघडकीस आला. अनैतिक संबंधातून खून झाला असल्याचा पोलिसांचा संशय आहे. याप्रकरणी गावभाग पोलिसांनी एका व्यक्तीस ताब्यात घेतले असून दुसऱ्याला लवकरच ताब्यात घेतले जाणार असल्याचे सांगितले. रेणुका भिमाप्पा पाटील (वय ३४) असे या महिलेचे नाव आहे.     
रेणुका पाटील हिचा विवाह बाडगी (जि.बागलकोट) येथील गोविंदाप्पा शिवलिंगप्पा पाटील यांच्याशी झाला होता. दोघांमध्ये सतत भांडणे होत असत. त्यामुळे उभयतांनी घटस्फोट घेतला होता. घटस्फोटानंतर रेणुका ही तारदाळ (ता.हातकणंगले) येथे आई-वडिलांकडे राहत होती. ती मोलमजुरी करीत होती.     
२१ जून रोजी ती महिला बचतगटाच्या बैठकीसाठी जाते असे आई-वडिलांना सांगून घराबाहेर पडली होती. तिचा शोध घेऊनही ती सापडली नव्हती. सोमवारी सकाळी शहापूर येथील स्टार नगरतील बांधीव विहिरीत प्लास्टिकचे पोते तरंगतांना दिसले. बघ्यांनी ही माहिती गावभाग पोलिसांनी दिली. पोलिसांनी मृतदेह काढण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. घटनास्थळी व्हाईट आर्मीच्या कार्यकर्त्यांना पाचारण करण्यात आले. सुमारे अडीच तासाच्या प्रयत्नानंतर मृतदेह वरती काढण्यात आला. मृतदेहाच्या खाणाखुनांच्या आधारे पोलिसांनी ओळख पटविण्याचा प्रयत्न केला असता मृतदेह रेणुकाचा असल्याचे स्पष्ट झाले. मृतदेहाचा चेहरा, कपाळ, कोपरा येथे धारदार शस्त्राने वार करण्यात आले होते. एका हातावर गजानन तर दुसऱ्या हातावर जावेद असे नाव गोंदलेले आहे. पोलीस उपअधीक्षक प्रकाश देशमुख, पोलीस निरीक्षक दुर्योधन पवार, पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत माने यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली.