नववर्षांच्या पूर्वसंध्येला उद्या २० मार्च रोजी शहरातील तेरा स्थानांहून महिलांच्या वाहन मिरवणुका निघणार आहेत. या मिरवणुकीत महिला पारंपरिक वेशभूषेत राहणार आहेत. या मिरवणुकीचे हे पाचवे वर्ष आहे.
या महिलांच्या मिरवणुका सोमलवाडा, त्रिमूर्तीनगर, धरमपेठ, गिट्टीखदान, सदर, बिनाकी, लालगंज, इतवारी, मोहिते शाखा, नंदनवन, अयोध्यानगर आणि अजनी भागातून निघतील. या सर्व मिरवणुकांचा प्रारंभ दुपारी ४ वाजता होणार आहे. प्रत्येक मिरवणुकीत जवळपास दोनशे ते अडीचशे महिला सहभागी होतील. या सर्व मिरवणुकांमध्ये शहरातील चार हजार महिला सहभागी होतील, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. तरुणींची मिरवणूक सीताबर्डीतील झाशी राणी चौकातून निघेल. या मिरवणुकीला ज्येष्ठ पत्रकार आसावरी शेनोलिकर हिरवी झेंडी दाखवून रवाना करतील. ही मिरवणूक व्हेरायटी चौक, महाराजबाग रोड, ट्रॉफिक पार्क, माता मंदिर रोड, लक्ष्मीभूवन चौक, शंकरनगरमार्गे निघून रामनगरात या मिरवणुकीचा समारोप होईल. राम मंदिरामध्ये नववर्षांचा संकल्प व बक्षीस वितरणाने या मिरवणुकीचा समारोप होईल.
इतवारी मिरवणुकीचा प्रारंभ आग्याराम देवी मंदिरापासून होणार असून समारोप पोद्दारेश्वर राम मंदिरात होईल. मोहिते शाखा मिरवणुकीचा प्रारंभ खोडे उद्यान येथून होऊन इतवारीतील संती गणेश मंडळ मैदानात समारोप होईल. नंदनवन मिरवणुकीचा प्रारंभ गजानन मंदिर येथून होऊन अयोध्यानगरातील साई मंदिरात समारोप, तर अजनी मिरवणुकीचा प्रारंभ बालाजीनगर मैदान येथून निघून काशीनगर येथे समारोप होईल. सोमलवाडा मिरवणुकीचा प्रारंभ उज्ज्वल नगरातून होणार असून समारोप वंसतनगरात होईल. त्रिमूर्तीनगर मिरवणूक टोपेनगरातील गणेश मंदिरातून निघेल आणि यशोदानगरातील रेणुका मंदिरात समारोप होईल.
सदर येथील मिरवणूक नारी गणेश मंदिरातून निघून सदरमधील हनुमाननगरात समारोप होईल. लालगंजची मिरवणूक शांतीनगर कॉलनी येथून निघून देवी मंदिरात समारोप, तर बिनाकीची मिरवणूक कमाल चौकातील आवळे चौकातून निघून स्वानंदनगरात समारोप होईल. गिट्टीखदान मिरवणुकीचा प्रारंभ चोपडे लॉन येथून होईल व परिसरातून फिरून चोपडे लॉनमध्येच समारोप होईल.
अजनी चौक, वर्धा रोड, पांडे ले-आऊट, जयप्रकाश नगर, लक्ष्मीनगर आदी वस्त्यांमध्ये नववर्षेच्या पूर्वसंध्येला पाचशेहून अधिक महिला रात्री ९.३० ते ११ दरम्यान आकर्षक रांगोळ्याद्वारे नववर्षांचे स्वागत करणार आहेत.
यासाठी ६५ पोते रांगोळी लागेल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. शहरातून निघणाऱ्या  मिरवणुकीत जास्तीत जास्त महिलांनी सहभागी व्हावे, असे आवाहन भारतीय नववर्ष स्वागत समितीचे संयोजक अनिल सांबरे यांनी पत्रकार परिषदेत केले.