* १८ ते २० वयोगटात  एक लाख १७ हजार  ९९४ तरुण मतदार
* ७१ हजार ४१२  महिला मतदारांचा समावेश
पनवेल विधानसभा मतदारसंघात यापुढे महिला आणि तरुणांची मते निर्णायक ठरण्याची चिन्हे आहेत. २००९ च्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत पनवेल विधानसभा मतदारसंघात ९७ हजार ९९९ नवीन मतदारांनी आपले नाव मतदार यादीत नोंदविल्याने हा मतदारसंघ तीन लाख ५३ हजार ९८८ मतदारांचा झाला आहे. पनवेल विधानसभा मतदारसंघात १८ ते २० वयोगटातील एक लाख १७ हजार ९९४ तरुण मतदारांची नोंद झाली आहे. त्यामध्ये ७१ हजार ४१२ महिला मतदार आहेत.
महिला आणि तरुण मतदारांनी नावनोंदणीत बाजी मारल्याने राजकीय पक्षांनी आपले लक्ष्य तरुण आणि महिलांकडे वळविले आहे. शहरीकरणामुळे झपाटय़ाने वाढ होत असलेला पनवेल हा राज्यातील सर्वाधिक मतदारांचा संघ म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. २००९ साली या मतदारसंघात २ लाख ५५ हजार ९८९ मतदार होते. पनवेल तालुक्यातील कामोठे, खारघर, कळंबोली, खांदा कॉलनी, नवीन पनवेल या सिडकोने वसविलेल्या शहरांमधील वाढत्या लोकसंख्येमुळे ही वाढ झाली आहे. त्यापैकी कामोठे शहरामध्ये १८ हजार ८१६, खारघरमध्ये २२ हजार दोनशे २६, खांदा कॉलनीमध्ये ११ हजार ८०८, नवीन पनवेलमध्ये १३ हजार ९८४ आणि कळंबोली शहरामध्ये २० हजार ६८९ मतदार आहेत.
सिडको वसाहतींचा विचार करता येथील मतदारांची संख्या ८७ हजार ५२३ एवढी झाली आहे. पनवेलचा ग्रामीण परिसरातील मतदारांची संख्या ६० हजार २४९ एवढी आहे.  पनवेल शहरातील मतदारांची संख्या ४१ हजार ९३६ एवढी आहे. पनवेलमध्ये एक लाख ७९ हजार ९४० मतदार हे १८ ते ४० वयोगटातील आहेत. वाढत्या शहरी मतदारांमुळे महिला आणि तरुणांच्या प्रभावामुळे यापुढे राजकीय पक्षांना बहुभाषिक मतदारांकडे लक्ष केंद्रित करावे लागणार आहे.