‘मुक्त शब्द’ मासिकातर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही २८ डिसेंबर ते ६ जानेवारी या कालावधी चिंतामणी ट्रस्ट उद्यान, शिंपोली टेलिफोन एक्स्चेंज जवळ, लिंक रोड, बोरिवली (प.) येथे ‘शब्द गप्पा’ रंगणार आहेत. तसेच यावेळी पुस्तक प्रदर्शनाचेही आयोजन करण्यात आले आहे. यंदा ‘शब्द गप्पां’चे आठवे वर्ष असून संगीतकार नीलेश मोहरीर यांच्या मुलाखतीने २८ डिसेंबर रोजी ‘शब्द गप्पां’ना सुरुवात होणार आहे. प्राचार्य केशव परांजपे नीलेश मोहरीर यांची मुलाखत घेमार आहेत. २९ डिसेंबर रोजी सामाजिक कार्यकर्त्यां, लेखिका रेणू गावस्कर यांची मुलाखत घेण्यात येणार आहे. ३१ डिसेंबर रोजी द्वारकानाथ संझगिरी आपल्या ठसकेबाज शैलीमध्ये शम्मी कपूर, जॉय मुखर्जी, देव आनंद, राजेश खन्ना, यश चोप्रा यांच्या आठवणींना चित्रफितीच्या माध्यमातून उजाळा देणार आहेत. १ जानेवारी रोजी ८६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक नागनाथ कोतापल्ले यांची नीरजा आणि महेंद्र भवरे मुलाखत घेणार आहेत. २ जानेवारी रोजी उपमुख्यमंत्री अजीत पवार यांची पत्रकार समर खडस, तर ३ जानेवारी रोजी लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांची पत्रकार मुकुंद कुळे मुलाखत घेणार आहेत. ४ जानेवारी रोजी ‘निमित्त दिल्ली गँगरेप’ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले असून त्यात मेघना पेठे, डॉ. आशीष देशपांडे, अ‍ॅड. पल्लवी रेणके, पोलीस अधिकारी जयवंत हरगुडे, संजय पवार आदी मान्यवर सहभागी होणार आहेत. या चर्चासत्रात संवादक म्हणून ज्ञानदा देशपांडे भूमिका पार पाडणार आहेत. ५ जानेवारी ‘फेसबुक : अभिव्यक्ती स्वातंत्र्य’ या विषयावर आयोजित करण्यात आलेल्या परिसंवादात अ‍ॅड. वैशाली भागवत, ज्ञानदा देशपांडे, संजय पवार, आनंद इंगळे, निनाद वेंगुर्लेकर सहभागी होणार असून परिवादाचे संपादन प्रसन्न जोशी करणार आहेत. ६ जानेवारी ‘रिडेव्हलपमेंट’ या विषयावरील चर्चासत्राने ‘शब्द गप्पां’ची सांगता होणार आहे. या परिसंवादात पालिका आयुक्त सीताराम कुंटे, म्हाडाचे उपाध्यक्ष सुभाष गवई, नीरा अडारकर, चंद्रशेखर आदी मान्यवर सहभागी होणार असून त्यांच्याशी पत्रकार निशांत सरवणकर आणि नितीन चव्हाण संवाद साधणार आहेत.