बालवयातील चांगल्या संस्कारांचा परिणाम तारुण्यात दिसून येतो व जीवनाचे ध्येय तारुण्यात निश्चित होते. त्यागाच्या भावनेने समाजाच्या भल्यासाठी कार्य करणे गरजेचे असल्याचे मत रामायणाचार्य संजय महाराज पाचपोर यांनी व्यक्त केले.
येथे झंबरलाल खटोड सामाजिक प्रतिष्ठानच्या राज्यस्तरीय कीर्तन महोत्सवात पाचपोर यांचे संगीत तुलसी श्रीराम कथेवर कीर्तन झाले. पाचपोरमहाराज म्हणाले, की आपल्या प्रत्येकाच्या जीवनात बालपण, तारुण्य व वृद्धत्व हे तीन योग येत असतात. त्याचा चांगला उपयोग व्हावा. बालपण संस्काराने, वृद्धत्व, भगवंत भजनाने व त्यागाने तारुण्य सुभोभित होते.
तारुण्यात देव, देश व धर्माबद्दल त्यागाची भावना निर्माण होते, हे सांगताना स्वातंत्र्यासाठी राष्ट्रभक्तांनी केलेला त्याग व समर्पणाचे दाखले त्यांनी दिले. जी माती जगण्यासाठी आपल्याला आधार देते त्या मातीचे उपकार कधी विसरू नये. नामसाधनेत मोठे सामथ्र्य आहे. समृद्ध जीवनासाठी नामचिंतन महत्त्वाचे आहे.
जीवनात वर्तमानात जगायला शिका, त्यासाठी भरपूर कष्ट करा, संपत्तीही कमवा. पण उद्याची अपेक्षा व आशा ठेवू नका. आशा माणसाला दु:खाकडे घेऊन जाते. जसे वय वाढते तसे आशाही वाढत जाते म्हणून जीवनात संयम आणि समाधानाने जगायला शिका, असा संदेश त्यांनी दिला.