जेएनपीटी बंदर आणि परिसराला वीजपुरवठा करणारे समुद्रकिनाऱ्यावरील उच्च दाबाच्या विद्युत वाहिन्यांचे टॉवर धोकादायक बनल्याने ते बदलण्यासाठी जेएनपीटी बंदर, तसेच परिसरातील वीजपुरवठा ३६ तासांसाठी खंडित करण्यात आलेला आहे. त्यामुळे जेएनपीटी बंदरातील कामकाजही बंद पडले आहे. 

उरणमधील महाजनकोच्या वायू विद्युत केंद्रातून वीजपुरवठा केला जातो. उच्च दाबाच्या विजेचा पुरवठा करण्यासाठी उभारण्यात आलेले टॉवर सडल्याने तसेच यापैकी काही टॉवर हे समुद्रकिनारी असल्याने वादळी वाऱ्याचा धोका संभवत असल्याने टॉवर हलवून जमिनीवर सुरक्षित ठिकाणी आणण्याचे काम सुरू आहे. अनेक दिवस काम चालणार असल्याने त्यामुळे जेएनपीटीच्या कामकाजावर परिणाम होऊ नये याकरिता युद्धपातळीवर रात्रंदिवसाच्या कामातून अवघ्या ३६ तासांत काम करण्यात येत आहे. त्यामुळे चोवीस तास लखलखाट असलेल्या जेएनपीटी कामगार वसाहतीत मात्र मागील दोन दिवसांपासून वीज नसल्याने नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. कामगार वसाहत तसेच बंदरातील अतिमहत्त्वाच्या ठिकाणी जनरेटरद्वारे वीजपुरवठा सुरू ठेवण्यात आलेला आहे. त्यामुळे जेएनपीटी बंदरातील कामकाजही बंद पडले असल्याची माहिती जेएनपीटीचे विद्युत तांत्रिक देखभाल अधिकारी तानाजी चव्हाण यांनी दिली आहे.