प्रशासकीय काम करताना सामाजिक जाणिवेतून कुपोषणासारख्या गंभीर व चिंताजनक विषयावर नांदेडच्या अधिकाऱ्यांनी केलेले काम कौतुकास्पद, तसेच अन्य जिल्हय़ांसाठी अनुकरणीय असल्याचे मत ‘रूरल रिलेशन्स’ या संस्थेचे संस्थापक प्रदीप लोखंडे यांनी व्यक्त केले. आपल्या संस्थेच्या वतीने या उपक्रमांतर्गत एक गाव दत्तक घेण्याची घोषणाही त्यांनी केली.
अभंग ग्रंथोत्सवासाठी नांदेडात आलेल्या लोखंडे यांनी दुपारी शासकीय विश्रामगृहावर कुपोषणमुक्तीसाठी परिश्रम करणाऱ्या निवडक अधिकाऱ्यांची भेट घेतली. कुपोषणमुक्तीसाठी स्वत:ला झोकून देणाऱ्या अतिरिक्त जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी या उपक्रमाची माहिती दिली व जिल्हय़ात आजपर्यंत झालेल्या कामाची विस्ताराने माहिती दिली. जिल्हय़ात गेल्या तीन महिन्यांपासून हे अभियान सुरू आहे. तीन महिन्यांपूर्वी जिल्हय़ात कुपोषित बालकांची संख्या २५ हजार ९७४ होती. पैकी ८ हजार ८५६ बालके कुपोषणमुक्त झाली.
जिल्हय़ातल्या चार उपविभागांत आजमितीस २५ हजार ९७४ कुपोषित बालकांपैकी तब्बल ११ हजार ८०० बालकांमध्ये सुधारणा झाली आहे. ३ हजार ६२७ पैकी ९३४ अंगणवाडय़ा कुपोषणमुक्त झाल्या आहेत. १ हजार ५९४ पैकी ३९० गावे आज कुपोषणमुक्त आहेत. हा उपक्रम सुरू करण्यामागची भूमिका, यासाठी समाजातल्या वेगवेगळय़ा घटकांकडून मिळालेले सहकार्य व अभियानाला आलेले यश हे पाहून लोखंडे यांनी उपक्रमाचे कौतुक केले.

अतिरिक्त जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, तहसीलदार अरविंद नरसीकर, पत्रकार संजीव कुळकर्णी, महिला व बालविकास अधिकारी राजू तोटावाड, नायब तहसीलदार सुनील माचेवाड, संजय नागमवाड, एम. एम. काकडे, तलाठी बच्चेवार, संदीप अल्लापुरकर यांची उपस्थिती होती. प्रशासनाच्या वतीने दिलीप स्वामी यांनी स्वागत केले. लोखंडे यांनी स्वामी यांना शिवाजीमहाराजांचे चरित्र हा ग्रंथ भेट दिला.