शहरातील बुरूडगाव रस्त्यावरील मनपाच्या प्रस्तावित भाजी मंडई व्यापारी संकुलाच्या बांधकामात मनपाचे आर्थिक नुकसान होत असल्याची तक्रार महाराष्ट्र नवनिर्माणसेनेने केली आहे. अल्प दरात ठेका दिलेले खासगी विकासकाकडील हे काम त्वरीत थांबवावे, अन्यथा आंदोलन करण्यात येऊन या प्रकल्पास न्यायालयात आव्हान देण्याचा इशारा मनसेचे जिल्हा संघटक सचिन डफळ यांनी दिला.
डफळ यांनी यासंदर्भात मनपा आयुक्त विजय कुलकर्णी यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की,  बुरूडगाव रस्त्यावर मनपाच्या मालकीच्या जागेवर भाजी मंडई व्यापारी संकुलाचे काम खाजगी विकासकातर्फे सुरू आहे. परंतु यात मनपाचे आर्थिक हित जोपासणे आवश्यक असताना मनपाच्या काही प्रशासकीय अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी भ्रष्टाचार केला आहे. मनपाच्या नगररचना विभागाने या संकुलाची मोबदला रक्कम १० कोटी रूपये निश्चित केली. यापेक्षाही अधिक रक्कम देऊन मनपाला अनेक विकासक मिळाले असते. परंतु स्थायी समितीने ही रक्कम तब्बल ७० टक्के कमी करून अवघ्या २ कोटी ८० लाखांत हा प्रकल्प विकासकाच्या घशात घातला. स्थायी समितीचे हे कृत्य बेकायदेशीर व मनपाचे आर्थिक नुकसान करणारे आहे, असा आरोप डफळ यांनी केला आहे.
निविदा प्रसिद्ध करताना विकासकांत स्पर्धा होण्याच्या दृष्टीने सदर जाहिरात राष्ट्रीय व राज्यस्तरीय वृत्तपत्रांत प्रसिद्ध करणे गरजेचे होते. परंतु तसे झाले नाही. त्यामुळे प्रशासन व पदाधिकाऱ्यांच्या मर्जीतील विकासकाला हे काम मिळाले. प्रशासनाला या गैरव्यवहाराची पूर्ण कल्पना होती. परंतु प्रशासनाने या कामात न्यायालयीन स्थगिती येऊ नये म्हणून कॅव्हेट दाखल करण्याची तत्परता
दाखविली.
त्यामुळे हा प्रस्ताव रद्द करून विकासकाने सुरू केलेले काम त्वरित थांबवावे, अन्यथा मनसे रस्त्यावर उतरून व्यापक आंदोलन करील व या प्रकल्पास न्यायालयिन स्थगिती आणण्यात येईल, असा इशारा डफळ यांनी निवेदनात दिला आहे.