News Flash

वर्षभरातील कामाच्या नोंदींचे जतन महत्त्वपूर्ण

महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेतील कामकाजांचे अहवाल अर्थात अभिलेख तयार करणे हे अतिशय महत्त्वपूर्ण काम. कारण प्रत्येक गावातील तंटामुक्त गाव समितीने वर्षभरात काय काम केले,

| March 14, 2013 02:25 am

महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेतील कामकाजांचे अहवाल अर्थात अभिलेख तयार करणे हे अतिशय महत्त्वपूर्ण काम. कारण प्रत्येक गावातील तंटामुक्त गाव समितीने वर्षभरात काय काम केले, त्याची माहिती या अभिलेखांच्या माध्यमातून समोर येते. शासन तंटामुक्त गाव जाहीर करताना या अभिलेखांची काटेकोरपणे तपासणी करते. यामुळे मोहिमेच्या प्रत्येक कामाची नोंद योग्य पद्धतीने ठेवणे आवश्यक ठरते. अभिलेखांशी संबंधित कामांची जबाबदारी समितीच्या निमंत्रकावर सोपविण्यात आली आहे.
दरवर्षी १५ ऑगस्ट ते ३० ऑगस्ट या कालावधीत ग्रामपंचायतींनी ग्रामसभेत या मोहिमेत सहभागी होण्याचा निर्णय घेतल्यानंतर खऱ्या अर्थाने नवीन वर्षांतील कामकाजास सुरुवात होते. गावातील अस्तित्वातील तंटे मिटविणे, नव्याने तंटे निर्माण होऊ नयेत म्हणून प्रयत्न करणे, त्याकरिता प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविणे अशी विविध कामगिरी तंटामुक्त गाव समितीला एकाच वेळी पार पाडावी लागते. प्रतिबंधात्मक उपाययोजनांची नोंदवही ठेवणे, तंटय़ांसंबंधी माहिती संकलित करणे, नोंद घेणे, त्यांचे वर्गीकरण करणे आदी कामे समितीच्या निमंत्रकांना करावी लागतात. परंतु, ही कामे अभिलेख समितीचे निमंत्रक व अध्यक्षांच्या स्वाक्षरीने करावी लागतात. गावातील दिवाणी, महसुली, फौजदारी व इतर स्वरूपाच्या तंटय़ांची माहिती संकलित केल्यावर प्रत्येक तंटय़ाची त्या त्या प्रकारात नोंद करावी लागते. त्याकरिता वेगवेगळ्या नोंदवाचा वापर करावा लागतो. फौजदारी मिटविता येण्यासारखे दखलपात्र तंटे यांची नोंद नोंदवही २ (अ) मध्ये करावी लागते, तर मिटविता न येणारे दखलपात्र फौजदारी तंटय़ाची नोंद नोंदवही – २ (ब) मध्ये करावी लागते. नव्याने निर्माण झालेल्या तंटय़ांची नोंद त्यांच्या प्रकारानुसार नोंदवही- ३ (अ) मध्ये व नोंदवही- ३ (ब) मध्ये केली जाते. मिटलेल्या तंटय़ांची नोंद- ३ (अ) मध्ये करण्यात येते.
या मोहिमेंतर्गत तंटे आणि तणाव निर्माण होण्याची कारणे शोधून त्यांचे निर्मूलन होईल यासाठी कार्यवाही केली जाते. सामाजिक शांतता प्रस्थापित होण्याच्या दृष्टीने लोकांमध्ये जागृती निर्माण करणे व त्यांचे प्रबोधन करणे, ग्रामसंरक्षण, सामाजिक सुरक्षितता आदींबाबत विविध उपक्रम हाती घेतले जातात. प्रतिबंधात्मक उपाययोजनांसंबंधी केलेल्या अशा कार्यवाहीची विशिष्ट पद्धतीने नोंद केली जाते. म्हणजे प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे उपशीर्ष, राबविलेली योजना, राबविलेल्या उपक्रमांची माहिती, सहभागी व्यक्ती, राबविलेल्या उपक्रमांमुळे झालेले परिणाम या पद्धतीने नोंद घेतली जाते. तंटय़ांचे वर्गीकरण, निराकरण करताना एक विशिष्ट पद्धतीत हे अभिलेख राहतील, याचीही दक्षता घेण्यात आली आहे.
अभिलेखांचे जतन करण्याची ही प्रक्रिया काहीशी क्लिष्ट वाटत असल्याने समिती सदस्य व निमंत्रकांना मोहिमेच्या प्रारंभी पोलीस ठाण्यांकडून प्रशिक्षणही दिले जाते. यामुळे प्रत्येक गावातील समितीचे हे अहवाल अर्थात अभिलेख एकसमान पद्धतीत राखणे शक्य झाले आहे.
गावातील शांततेचे वातावरण विकास प्रक्रियेला पोषक ठरत असते. ही बाब लक्षात घेऊन शासनाने ग्रामीण भागातील तंटाबखेडय़ांचे प्रमाण कमी करण्यासाठी महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान सुरू केले आहे. या माध्यमातून स्थानिक पातळीवरील तंटे सामोपचाराने मिटविणे आणि विविध स्वरूपाचे उपक्रम राबवून ग्रामीण भागाच्या विकासाला चालना देण्याचा प्रयत्न होत आहे. या अभियानातील एकूणच कामगिरीचा वेध लेखमालेतून घेण्यात येत आहे. मालेतील तिसावा लेख.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 14, 2013 2:25 am

Web Title: work registration is important
Next Stories
1 पाणी चोरी सुरूच; साठवणूक तलावात निम्मेच पाणी
2 करारनाम्याचे उल्लंघन; पाणी वापर संस्थेच्या सभासदांचा इशारा
3 उलगडणार शिवकालीन शस्त्रास्त्रांचा खजिना
Just Now!
X