लोकसभा निवडणुकांच्या कामांमुळे वाशी येथील सेतू कार्यालयामध्ये आठवडाभरापासून खाजगी कर्मचारी वगळता एकही शासकीय कर्मचारी या कार्यालयाकडे फिरकला नसल्यामुळे वाशी येथील सेतू कार्यालय दाखले काढण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना हात हलवत परत यावे लागत आहे. सेतू कार्यालयात तलाठीच नसल्याने दाखल्यांच्या कामासाठी ठाणे तहसीलदार गाठण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. नवी मुंबईकरांसाठी महाराष्ट्र शासनाच्या वाशी येथील सेतू कार्यालयात सुरू करण्यात आले. या कार्यालयात उत्पन्नाचे दाखले, ज्येष्ठ नागरिकांचे दाखले यांसह शाळा महाविद्यालयामध्ये लागणारे दाखले घेण्यासाठी दररोज शेकडो नागरिक वाशी सेतू कार्यालयात येतात. मात्र निवडणुकींच्या कामात सरकारी यंत्रणा व्यस्त आहे. कारकुनापासून तलाठय़ापर्यत सर्वच जण निवडणुकांच्या कामात व्यस्त आहेत.  यामुळे तलाठी कार्यालयात येत नसल्याने नागरिकांचे अर्ज स्वीकारले जात नसल्याने नागरिकांना आल्या पावली परत जावे लागत आहे म् नवी मुंबईतील नागरिकांना पूर्वी ठाणे जिल्हाधिकारी व तहसील कार्यालयात विविध दाखले मिळवण्यासाठी जावे लागत होते म् मात्र या ठिकाणी लागणाऱ्या रांगांमुळे नागरिकांना दिवसभर ताठकळत उभे राहवे लागत होते. त्यामुळे नवी मुंबईकरांना आर्थिक भरुदडासह वेळेच्याही अपव्ययाला सामोरे जावे लागत होते. यासाठी वाशीत मध्यवर्ती ठिकाणी सेतू कार्यालय सुरु करण्यात यावे अशी मागणी वारंवार होत असल्याने महाराष्ट्र शासनाने यांची दखल घेत २०१२ मध्ये वाशी सेक्टर १ येथे सेतू कार्यालय सुरू केले. पण सध्याची स्थिती पाहता वाशी सेतू कार्यालयात दाखले मिळत नसल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे म् सेतू कार्यालयातील खाजगी कर्मचारी नागरिकांना सांगतात की, सध्या दाखले देण्याचे काम वरूनच बंद असल्याने केवळ अर्ज वितरण केले जात आहे म् तातडीने अर्ज हवे असल्यास ठाणे सेतू कार्यालयाशी संपर्क साधण्याचा सल्ला हे कर्मचारी देत आहेत. यांसदर्भात तहसीलदार विकास पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, निवडणुकांमुळे कर्मचारी उपलब्ध नसल्याने भाइंदर व वाशी सेतू कार्यालयाचे काम २४ एप्रिलपर्यत थांबवण्यात आले. निवडणुकीनंतर काम पूर्ववत सुरू होईल.  ज्यांना तातडीने दाखले हवे आहेत त्यांनी ठाणे सेतू कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन त्यांनी केले आहे.