अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी सोमवारपासून बेमुदत काम बंद ठेवत विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. या आंदोलनात शहर व परिसरातील हजारांहून अधिक अंगणवाडी सेविका व कर्मचारी उतरल्या आहेत.    
राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या संयुक्तकृती समितीच्या वतीने सोमवारपासून बेमुदत संप सुरू केला आहे. निवृत्तिवेतन योजना जाहीर करावी, महागाई भत्ता व वार्षिक पगारवाढ द्यावी, एक महिन्याच्या मानधनाइतका बोनस द्यावा, रिक्त जागा कंत्राटी पद्धतीने भरण्याचा निर्णय रद्द करावा, सर्व सोयींनीयुक्त अंगणवाडी केंद्रे बांधावीत आदी मागण्यांसाठी मोर्चाचे आयोजन केले होते. मोर्चाचे नेतृत्व कॉ. चंद्रकांत यादव, संगीता किल्लेदार, संध्या सोनटक्के, संध्या लिंगडे, स. पी. संकपाळ आदींनी केले. अप्पर जिल्हाधिकारी आप्पासाहेब धुळाज व जि. प. चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन माने यांना निवेदन देण्यात आले.
झोपडपट्टीवासियांचा मोर्चा
प्रतिनिधी, कोल्हापूर    
शासकीय जागेवर गेल्या पन्नास वर्षांपासून असणाऱ्या विचारेमाळ झोपडपट्टीधारकांना राहत्या घराचे मालकी हक्क व प्रॉपर्टी कार्ड मिळावे या मागणीसाठी तेथील नागरिकांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. विचारेमाळ लोकसंघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला. मोर्चाचे नेतृत्व बी. जी. मांगले, शुभांगी भोसले, रमेश भोसले, दीपक बिराजदार, सचिन कांबळे, बाळासाहेब भोसले आदींनी केले. निवासी उपजिल्हाधिकारी संजय पवार यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.