कार्यालयीन वेळ संपल्यानंतर दोन तास थांबून दर शुक्रवारी कार्यालय आणि परिसराची साफसफाई करण्याचा फतवा पालिका प्रशासनाने काढल्यामुळे पालिका कार्यालयांमधील अधिकारी- कर्मचारी हवालदिल झाले आहेत. कारवाई होण्याच्या भीतीमुळे अधिकाऱ्यांनाही हातात झाडू घ्यावा लागला आहे, तर दूर राहणाऱ्या महिला कर्मचारी नाके मुरडतच हे काम करीत आहेत. कर्मचारी संघटनाही याविरोधात आवाज उठविण्यास राजी नसल्याने तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करीत अधिकारी- कर्मचारी कार्यालयाची साफसफाई करीत आहेत. आता पालिका कर्मचाऱ्यांना शुक्रवार नकोसा झाला आहे.
स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत दर शुक्रवारी कार्यालयाची वेळ संपल्यानंतर सायंकाळी ५.३० ते ७.३० या वेळेत कार्यालयांमध्ये अधिकारी व कर्मचाऱ्यांनी साफसफाई मोहीम राबविण्याचे आदेश पालिका प्रशासनाने परिपत्रक जारी करून दिले आहेत, त्यामुळे दर शुक्रवारी ५.३० वाजता अधिकारी अथवा कर्मचाऱ्याला कार्यालयाबाहेर जाता येत नाही. सामान्य प्रशासन विभागातील प्रतिनिधींच्या साक्षीने ही साफसफाई करावी लागत आहे. या कामात कुचराई करणाऱ्यांविरुद्ध कारवाईचा बडगा उगारण्यात येणार असल्याने अधिकारी- कर्मचारी गर्भगळीत झाले असून ते मुकाट हाती झाडू घेऊन सफाई करू लागले आहेत.
या साफसफाई मोहिमेमुळे शुक्रवारी कार्यलयातून लवकर पळणे सोडाच, पण विनाकारण दांडी मारणेही अवघड बनले आहे. अधिकारी- कर्मचाऱ्यांना केवळ कार्यालयच नव्हे, तर लगतचा परिसरही स्वच्छ करावा लागत आहे. अधिकाऱ्यांचे दालन, कार्यालयीन कक्ष, मांडणी, टेबल, खुच्र्या, पडदे, कपाटे, दिवे, पंखे, विजेची उपकरणे, वायरिंग,  कुलर, झेरॉक्स मशीन, स्कॅनर मशीन, अभिलेख, शोभेच्या कुंडय़ा, भित्तिपत्रके, जुनी कॅलेंडरे, फोटो, नोटीस बोर्ड, रद्दी पेपर, दरवाजे, खिडक्या, ग्रिल, संगणक, जमीन आदींची सफाई योग्य पद्धतीने केली आहे की नाही याचा अहवाल दर शुक्रवारी सामान्य प्रशासन विभागाचा प्रतिनिधी तयार करून संबंधित अधिकाऱ्याला सादर करीत आहे. या कामात कुचराई करणाऱ्यांवर कारवाईचा बडगाही उगारण्यात येणार आहे. दूर राहणारे अधिकारी- कर्मचारी आता या अभियानाला कंटाळले आहेत. मात्र कारवाईच्या भीतीपोटी कोणीही आवाज उठवायला तयार नाही.
प्रशासनाने परिपत्रक काढून दर शुक्रवारी साफसफाईचे आदेश दिले, मात्र हॅन्डग्लोज, मास्क  याशिवायच आम्हाला कार्यालय व परिसराची सफाई करावी लागत आहे. केवळ अभियान यशस्वी करण्याच्या नावाखाली प्रशासनाने हा खटाटोप चालविला आहे; परंतु धुळीमुळे कर्मचाऱ्यांना होत असलेल्या त्रासाकडे प्रशासन दुर्लक्ष करीत आहे, असे नाव जाहीर न करण्याच्या अटीवर एका अधिकाऱ्याने सांगितले.