केंद्रीय कामगार संघटनांनी पुकारलेल्या भारत बंद आंदोलनांतर्गत इचलकरंजीत कामगारांनी मोर्चा काढून शासनाविरोधात निदर्शने केली. तर नगरपालिका कर्मचारी, शिक्षक यांनी काळय़ा फिती लावून काम केले.    
इचलकरंजीमध्ये यंत्रमाग कामगारांचे गेल्या ३० दिवसांपासून कामबंद आंदोलन सुरू आहे. यंत्रमाग कामगार संयुक्त कृती समितीच्या वतीने सुरू असलेल्या या आंदोलनाने देशव्यापी आंदोलनातही सहभाग नोंदविला. शाहू पुतळय़ापासून कामगारांच्या मोर्चाला सुरुवात झाली. त्याची सांगता व्यंकोबा मैदान येथे जाहीर सभेने झाली. कामगार नेते दत्ता माने, मिश्रीलाल जाजू, भरमा कांबळे, सायझिंग कामगार संघटनेचे नेते प्राचार्य ए. बी. पाटील, वहिफणी एजंट असोसिएशनचे अध्यक्ष महादेव गौड, राजेंद्र निकम यांची भाषणे झाली. जिल्हाधिकाऱ्यांनी बोनस शिवाय ८५ पैसे मजुरी देण्याचा प्रस्ताव मान्य करावा, अन्यथा गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर १० हजार कामगारांचा मोर्चा काढण्यात येणार असल्याचे सांगितले. या आंदोलनात यंत्रमाग कामगार, सायझिंग-वार्पिग कामगार सहभागी झाले होते.    
इचलकरंजी नगरपालिकेतील सर्व पाच कर्मचारी संघटनांनी एकत्रित येऊन पालिकेच्या प्रवेशद्वारासमोर जोरदार घोषणाबाजी करीत निदर्शने केली. सुभाष मोरे, नगरसेवक संभाजी काटकर, शिवाजी जगताप, के. के. कांबळे, नवशाद जावळे, शंकर अगसर, हरि माळी, धनंजय पळसुले यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आली. कामगारांच्या प्रलंबित मागण्यांसाठी मुख्याधिकारी नितीन देसाई यांना निवेदन देण्यात आले. शासनाच्या धोरणाच्या निषेधार्थ कर्मचाऱ्यांनी दिवसभर काळय़ा फिती लावून काम केले.    
बीएसएनएल कर्मचारी संघटनेच्या वतीने निरगुंतवणुकीच्या धोरणास विरोध करीत कार्यालयासमोर निदर्शने केली. शिवाजी जाधव, आर. के. सूर्यवंशी, शिवाजी पाटील, चंद्रकांत जगताप, अशोक पोवार यांच्यासह अधिकारी-कर्मचारी सहभागी झाले होते. राष्ट्रीयीकृत बँकेतील कर्मचारी बंदमध्ये सहभागी झाल्याने कोटय़वधी रुपयांचे व्यवहार ठप्प झाले होते. शिक्षकांनी तसेच वृत्तपत्र विक्रेत्यांनी काळय़ा फिती लावून काम केले.