बुटीबोरी औद्योगिक वसाहतीत काम करणाऱ्या गरीब कामगारांसाठी इंडोरामा कामगार गृहनिर्माण सहकारी संस्थेमार्फत बांधण्यात आलेल्या वीर सावरकर नगरातील घरकुलांचे हस्तांतरण उद्या, मंगळवारी १५ जानेवारीला राज्याचे उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या हस्ते एका भव्य सोहळ्यात करण्यात येणार आहे. या सोहळ्यात प्रकल्पाचे मार्गदर्शक व भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी प्रामुख्याने उपस्थित राहणार असून अध्यक्षस्थान आमदार देवेंद्र फडणवीस भूषविणार आहेत.
गरजू आणि आर्थिकदृष्टय़ा दुर्बल असलेल्या कामगारांकरिता कार्य करण्यासाठी तसेच त्यांच्या घराचे स्वप्न पूर्ण व्हावे, यासाठी नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली इंडोरामा कामगार गृहनिर्माण सहकारी संस्थेची स्थापना करण्यात       आली.
प्रारंभी संस्थेला एमआयडीसीकडून जागा मंजूर होताच प्रकल्पाच्या फेज १ या पहिल्या टप्प्यात १२८ घरकुलांचे बांधकाम पूर्ण करण्यात येऊन कामगारांना त्याचे हस्तांतरण २००८ मध्ये गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले.  
प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील घरकूल हस्तांतरणानंतर संस्थेवर कामगारांचा विश्वास वाढला आणि फेज २ योजनेसाठी घरांची मागणी वाढली.
त्यादृष्टीने फेज २ चे काम पूर्ण करण्यात आले असून यातील २७० घरांचे हस्तांतरण नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या हस्ते मंगळवारी १५ जानेवारीला सकाळी १० वाजता करण्यात येणार आहे.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून आमदार चंद्रशेखर बावनकुळे, विजय घोडमारे, सुधीर पारवे, कृष्णा खोपडे, सुधाकर देशमुख, विकास कुंभारे, नागो गाणार, जिल्हा परिषद अध्यक्षा संध्या गोतमारे, बुटीबोरी मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनचे अध्यक्ष हेमंत अंबासेलकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ. राजीव पोतदार, महापौर अनिल सोले, विदर्भ प्रिमियर को-ऑप. हाऊसिंग सोसायटीचे अध्यक्ष रवींद्र दुरुगकर, नागपूर नागरिक सहकारी बँकेचे अध्यक्ष राजेश लोया उपस्थित राहणार    आहेत.
या सोहळ्याला परिसरातील नागरिकांनी तसेच एमआयडीसीतील उद्योजक व कामगारांनी हजर राहावे, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष राजकुमार शर्मा, सचिव देवेंद्र काटोलकर व संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.