कोल्हापूर ११ कामगार संघटनांनी एकत्रित येऊन संयुक्त कामगार कृती समिती स्थापन केली असून, या समितीच्या वतीने १२ डिसेंबर रोजी दैवज्ञ बोर्डिग येथे सायंकाळी ५ वाजता मेळाव्याचे आयोजन केले आहे.
सर्व कामगार संघटनांनी एकत्रित येऊन कामगारप्रश्नी आंदोलन करण्याचा निर्णय राष्ट्रीय पातळीवर घेण्यात आला आहे. याअंतर्गत कोल्हापुरातही आंदोलनाचे विविध टप्पे राबविले जाणार आहेत. त्याचे नियोजन करण्यासाठी आयटक कामगार कार्यालयात सर्व कामगार संघटनांची बैठक झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी कॉ. गोविंद पानसरे होते. बैठकीस आयटक, सिटू, बी.एम.एस., इंटक, सर्व श्रमिक संघ, वीजकर्मचारी, एस.टी.कर्मचारी संघटना, सरकारी नोकर युनियन इत्यादी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
केंद्रीय पातळीवरील १८ व १९ डिसेंबर रोजी सर्व कामगार संघटना आपापल्या जिल्हय़ात कायदेभंगाची चळवळ करणार आहेत. २० डिसेंबर रोजी दिल्ली येथे संसदेवर आंदोलन, तर २० व २१ फेब्रुवारी दोन दिवसांचा बंदचा निर्णय घेण्यात आला आहे. आंदोलनामध्ये महागाई कमी करा, कामगार कायद्यांची काटेकोर अंमलबजावणी करा, बेकारांना काम द्या, असंघटित वृद्धापकाळात पेन्शन सुरू करा व इतर सामाजिक सुरक्षा लागू करा, कंत्राटी कामगारांना कायम कामगारांइतके वेतन द्या, शासकीय पातळीवरील २५ लाख रिक्त पदे त्वरित भरा, या प्रमुख मागण्या करण्यात येणार आहेत.
बैठकीस कॉ. गोविंद पानसरे, अतुल दिघे, सुभाष जाधव, आनंदराव पाटील, अनिल लवेकर, चंद्रकांत यादव, बाबूराव तारळी, एस. बी. पाटील, सुशीला यादव आदी उपस्थित होते.