महाराष्ट्र ग्रामीण रोजगार योजनेंतर्गत गेल्या ३० जूनपर्यंत रस्त्यांची ५ हजार ७९६, तर पाझर तलावांची ४ हजार ३५९ अशी १० हजार १३५ कामे राज्यात अपूर्ण आहेत. ही कामे पूर्ण करण्यास सरकारने मुदतवाढ दिली आहे.
िहगोली जिल्ह्यातील १२१ पाणंद रस्ते, तसेच १० शेततळ्यांचा यात समावेश आहे. राज्यात १ एप्रिल २००८ रोजी जुन्या रोजगार हमी योजनेतील जी कामे अपूर्ण आहेत, त्याबाबतच्या याद्या जिल्हा प्रशासनाने सरकारला सादर केल्या. सरकारने ही कामे पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. कामे पूर्ण करण्यास वेळोवळी मुदतवाढ देण्यात आली. त्यानंतर १८ मार्च २०११ रोजी निर्गमित केलेल्या आदेशानुसार रस्त्यांची ५ हजार ४८६, तर पाझर तलावाची ४ हजार ३४९ एकूण १० हजार ३५ कामे पूर्ण करण्यास मान्यता देण्यात आली. ही कामे ३ वर्षांचा कालबद्ध कार्यक्रम आखून पूर्ण करणे आवश्यक होते. याची मुदत ३० जूनपर्यंत होती. दुष्काळाच्या पाश्र्वभूमीवर ही कामे पूर्ण करण्यास ३० जूनपर्यंत मुदतवाढ दिली होती.
आता नव्याने दरम्यानच्या काळातील अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी ३० जून २०१४ पर्यंत अंतिम मुदतवाढ देण्यात आली आहे. या साठी प्रत्येक जिल्ह्याने त्यांच्याकडील शासनमान्य अपूर्ण कामांच्या यादीतील कामे पूर्ण करण्याबाबत कामनिहाय व महिनावार कृती आरखडा तयार करावा व तो ३० नोव्हेंबपर्यंत सरकारला सादर करावा, असे कळविण्यात आले आहे. िहगोली जिल्ह्यात एकूण १२६ कामांमध्ये भौतिकदृष्टय़ा पाणंद रस्त्याची २२ कामे पूर्ण झाली, तर १०४ कामे प्रगतिपथावर असल्याची नोंद आहे. नरेगाअंर्तगत भौतिकदृष्टय़ा ५९७ शेततळ्यांची कामे पूर्ण होऊन १० कामे प्रगतिपथावर असल्याच्या नोंदी कार्यालयीन दप्तरी आहेत. आता तरी ही कामे पूर्ण होणार का, अशी चर्चा आहे.