पुणे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रिसर्च इन्स्टिटय़ूट आणि नाशिकच्या समाज कल्याण विभागातर्फे सर्व तालुक्यांच्या ठिकाणी अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक १९८९ कायद्यासंदर्भात जाणीव जागृतीकरिता प्रशिक्षण शिबीरांचे आयोजन करण्यात येत असल्याची माहिती प्रकल्प संचालक मोहन रोले यांनी दिली.
जिल्ह्यातील १५ ंपैकी कळवण, मालेगाव, बागलाण, देवळा, चांदवड, नांदगाव, येवला, सुरगाणा, पेठ, इगतपुरी आणि निफाड या ११ तालुक्यांच्या ठिकाणी या शिबीरांतर्गत प्रशिक्षण देण्यात आले आहे. प्रत्येक तालुक्यातील तहसीलदार, गटविकास अधिकारी, सहाय्यक गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी, पंचायत समितीचे सभापती, उपसभापती, नायब तहसीलदार, पोलीस निरीक्षक, सरपंच, पोलीस पाटील आदी सर्वानीच प्रशिक्षणामध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवला आहे.
अ‍ॅड. मनस्वी तायडे, प्रा. अशोक सोनवणे, प्राचार्य विलास देशमुख आदी प्रमुख मान्यवर अभ्यासकांचे मार्गदर्शन प्रशिक्षणार्थीना लाभले असल्याचेही त्यांनी सांगितले. नाशिक समाजकल्याण विभागाचे विशेष अधिकारी देवदास नांदगांवकर व विजय चव्हाण, सुरेश पाटील यांचे विशेष सहकार्य मिळाले आहे.