सोलापूर श्रमिक पत्रकार संघ व लोकमंगल प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या २७ व २८ एप्रिल रोजी सोलापुरात दि हेरिटेज गार्डनमध्ये पत्रकारांसाठी कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेत राज्यातील मान्यवर ज्येष्ठ संपादक व नामवंत पत्रकार मार्गदर्शन करणार आहेत.
दि. २७ रोजी सकाळी पोलीस आयुक्त प्रदीप रासकर यांच्या हस्ते व महापौर अलका राठोड यांच्या अध्यक्षतेखाली कार्यशाळेचे उद्घाटन झाल्यानंतर दिव्य मराठीचे सल्लागार संपादक यमाजी मालकर (पुणे) हे ‘देशातील अर्थकारण आणि पत्रकारिता’ या विषयावर विचार मांडणार आहेत. दुसऱ्या सत्रात शासनाच्या वि. स. पागे संसदीय प्रशिक्षण केंद्राचे संचालक नागेस केसरी (मुंबई) यांचे ‘संसदीय कामकाजाचे वार्ताकन’ या विषयावर मार्गदर्शन होणार आहे. याशिवाय ई टीव्हीचे वृत्त विभागप्रमुख मंदार परब (न्यूज चॅनेलसाठीची बातमीदारी) व मुंबईच्या तारांगणचे संपादक मंदार जोशी (चंदेरी दुनियेतील पत्रकारिता) हे कार्यशाळेत सहभागी होऊन मार्गदर्शन करतील.
रविवारी, पुण्याच्या पुण्यनगरीच्या संपादिका राही भिडे (मराठी पत्रकारिता आणि जागतिकीकरण), चित्रलेखाचे संपादक ज्ञानेश महाराव (पत्रकारिता कशासाठी?) व झी टीव्हीचे अजित चव्हाण (वृत्तवाहिन्यांचा प्रभाव आणि त्याचे परिणाम) ही मंडळी मार्गदर्शन करतील. तर दुपारी तीन वाजता अखेरच्या सत्रात ‘लोकसत्ता’ पुणे आवृत्तीचे निवासी संपादक मुकुंद संगोराम हे ‘पत्रकारितेपुढील आव्हाने’ या विषयावर मार्गदर्शन करून या कार्यशाळेचा समारोप करणार आहेत. पत्रकारांनी या कार्यशाळेत सहभागी होण्याचे आवाहन सोलापूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष मनोज व्हटकर व लोकमंगल प्रतिष्ठानचे अध्यक्ष, माजी खासदार सुभाष देशमुख यांनी केले आहे.