अ‍ॅडोलसेंट हेल्थ अ‍ॅकेडमी, इंडियन अ‍ॅकेडमी ऑफ पिडियाट्रीक्सच्या (आयएपी) आणि इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) यांच्या नागपूर शाखांच्या संयुक्त विद्यमाने अमरावती जिल्ह्य़ातील धारणीला दोन दिवसांची समुपदेशक प्रशिक्षण कार्यशाळा नुकतीच आयोजित करण्यात आली. आदिवासी भागातील समुपदेशक हे डॉक्टर्स, रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक यांच्यातील दुवा म्हणून काम करणारे आरोग्य सेवक आहेत.
आदिवासी भागात डॉक्टरांची कमतरता असल्याने आरोग्य शिक्षणासाठी समुपदेशकच महत्त्वाचे घटक आहेत. त्यांना प्रशिक्षित करण्याच्या हेतूने ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली. यामध्ये जवळपास ८० समुपदेशकांना प्रशिक्षणे देण्यात आले.
 किशोरावस्थेत गरोदर राहण्याला प्रतिबंध कसा घालता येईल?, लवकर लग्न, तंबाखू व दारूच्या आधीन गेल्याने उद्भणारे संकट, एचआयव्ही, एड्स, लैिगक आजार आदी विषयांवर कार्यशाळेत गट चर्चा झाली. आयएपीचे अध्यक्ष डॉ. अनिल राऊत आणि त्यांची चमू आदिवासी भागातील कुपोषित बालकांची आरोग्य तपासणीसाठी मदत करणार असून आरोग्य सेवकांना तज्ज्ञांमार्फत प्रशिक्षण दिले जाणार आहे. आदिवासी भागातील नवजात बालकांचे मृत्युदर घटविणे हा असोसिएशनचा मुख्य उद्देश आहे. आदिवासी भागात पाच वर्षे हा उपक्रम राबविला जाणार आहे.कार्यशाळेला डॉ. अभिजित भारद्वाज, डॉ. शुभदा खिरवाडकर, डॉ. आर.जी. पाटील,  डॉ. अविनाश गावंडे व डॉ. आशिष सातव, डॉ. किशोर बोबडे, डॉ. अनिल राऊत, डॉ. कुश झुनझुनवाला, डॉ. वर्षां ढवळे, डॉ. वैशाली खंडाईत आदी प्रामुख्याने उपस्थित होते.