किशोरवयीन मुलींच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास व्हावा म्हणून एमआयटी औरंगाबाद व स्त्री जागरण मंचच्या वतीने तारुण्यभान या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. २३ ते २५ ऑक्टोबर दरम्यान होणाऱ्या या कार्यशाळेसाठी महाराष्ट्रभूषण डॉ. राणी बंग औरंगाबाद येथे येणार आहेत. १६ ते २५ वयोगटातील ३०० ते ३५० मुलींसाठी हा उपक्रम होणार आहे.
देशात लैंगिक शिक्षण या विषयावर फारशी चर्चा होत नाही. कारण नसताना विषयाचा बाऊ केला जातो. या विषयाच्या चर्चेची गरज आहे का, उगाच काहीतरी फॅड अशी या विषयाबाबत करून देण्यात आलेली धारणा चुकीची असते. या अनुषंगाने करण्यात आलेल्या अभ्यासगटांचे निष्कर्ष अभ्यासल्यानंतर अशा कार्यक्रमांची गरज आहे. हे लक्षात घेऊन तारुण्यभान या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेत वयात येताना होणारे शारीरिक आणि मानसिक बदल, प्रजनन इंद्रिये रचना व कार्य, मैत्री आकर्षण व प्रेम-सीमारेषा, मर्यादा आणि धोके, तारुण्यातील जबाबदार वर्तन, व्यसनाधीनता, योग्य जोडीदाराची निवड, विवाह आणि वैवाहिक जीवन, आत्मसन्मान, परस्पर सन्मान व समृद्ध नातेसंबंध याविषयी मार्गदर्शन होणार आहे. डॉ. राणी बंग या कार्यक्रमाच्या संवादक आहेत. आतापर्यंत २२९ कार्यशाळा आयोजित करण्यात आल्या असून ४५ हजार युवतींपर्यंत त्यांनी हा विषय पोहोचविला आहे.